हातावरील टॅटूच्या आधारे वायर चोरणारी टोळी रामनगर पोलिसांचा जाळ्यात तीन आरोपी अटकेत, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बांधकामाधीन घरांमधून विद्युत वायर चोरी करणाऱ्या टोळीचा रामनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या हातावरील टॅटूच्या आधारे छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या वायरसह विविध गुन्ह्यांतील तांब्याच्या तारांचा मिळून १ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अभिषेक राजेश थानकराटे (२१) रा. राजीव गांधी नगर फुकट नगर चंद्रपूर, प्रियांशू प्रल्हाद मृदा (२१) रा.बंगाली कॅम्प चंद्रपूर, नयन संजय देवनाथ (१९) रा बंगाली कॅम्प चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
चव्हाण कॉलनी, छत्रपतीनगर, तुकूम येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त कर्मचारी कुमारेश सुचिर मिस्त्री (वय ६२) यांच्या नव्याने बांधलेल्या घरातून अज्ञात चोरट्यांनी विद्युत वायर चोरी केल्याची घटना घडली होती. यापूर्वीही त्याच घरातील संपूर्ण वायरिंग कापून चोरी करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमध्ये फिर्यादीचे सुमारे ४ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले होते.
रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयिताच्या हातावरील विशिष्ट टॅटूमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अभिषेक राजेश धानकराटे (२१), प्रियांशु प्रल्हाद मृधा (२१) आणि नयन संजय देवनाथ (१९) या तिघांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून चोरीस गेलेल्या विद्युत वायरचे तुकडे, एक होंडा अॅक्टिव्हा मोपेड आणि इतर चोरीच्या गुन्ह्यांतील तांब्याच्या तारांचा साठा जप्त करण्यात आला. सुरुवातीला ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता आरोपींनी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्या आधारे ४५ हजार ५०० रुपयांचा अतिरिक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आतापर्यंत एकूण १ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चोरीच्या आणखी घटनांबाबत तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील अधिकारी स.पो.नी. शिवाजी नागवे, पोउनी. कृष्णा दराडे, पोहवा आनंद खरात, जितेंद्र आकरे, शरद कुड़े, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, प्रकाश बलकी, मपोहवा. मनिषा मोरे, पोअं संदिप कामडी, रविकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल पप्पुलवार, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, संदिप गेडाम, प्रकाश मडावी, म.पो.अं. ब्ल्युटी साखरे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




