महत्वाच्या बातम्या

 आरमोरी-पालोरा मार्गावर दुचाकींची भीषण धडक : तरुण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी-पालोरा मुख्य मार्गावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या ६५ वर्षीय वृद्ध चालकाविरुद्ध आरमोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईचंद आनंदराव वाटगुरे (३०, रा. आष्टा) हा २६ मे रोजी सकाळच्या सुमारास दुचाकीने मजुरीसाठी आरमोरीकडे जात होता. दरम्यान, पालोरा गावाजवळ पोहोचताच आरमोरीहून भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्याच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही चालक रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले.

योगायोगाने जखमी भाईचंदचा चुलत भाऊ सुरेंद्र वाटगुरे याच मार्गाने जात होता. अपघात पाहताच त्याने तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि रुग्णवाहिकेच्या सहाय्याने दोन्ही जखमींना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर भाईचंद वाटगुरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातप्रकरणी पोलिसांनी तपास करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या रामचंद्र श्रावण राऊत (६५, रा. आरमोरी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos