जमीन वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला : दोन आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : तुमसर तालुक्यातील हरदोली येथे अंगणात झोपलेल्या तरुणावर ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील दोन आरोपींना गोबरवाही पोलिसांनी सहा दिवसांच्या तपासानंतर अटक केली आहे. जमीन वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव राजू बन्सीलाल राऊत (२४, हरदोली) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ ते १८ मेच्या रात्री राजू हा त्याचे मोठे वडील रतन राऊत यांच्या घरी अंगणात झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या डोक्यावर कंबल टाकून ब्लेडसारख्या धारदार वस्तूने गळ्यावर आणि गालावर सपासप वार केले.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे राजू गंभीर जखमी झाला. मात्र, त्याने धैर्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. आरडाओरड ऐकून नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत राजूला प्रथम तुमसर येथील रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला. सुरुवातीला जखमी व साक्षीदारांकडून माहिती घेऊनही हल्ल्यामागचे कारण स्पष्ट होत नव्हते. संशयितांकडूनही फारशी माहिती मिळत नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
दरम्यान, पोलिस निरीक्षक विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनाखाली गोबरवाही पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पथकाने तांत्रिक तपास सुरू ठेवला. तपासादरम्यान राजू राऊत यांच्या घराच्या जागेवरून जुना वाद असल्याचे निष्पन्न झाले. त्याच कारणातून शैलेश राऊत (३८, हरदोली) आणि कुणाल राऊत (३०, इसासणी, नागपूर) यांनी हल्ल्याचे कट रचल्याचे समोर आले.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना २४ मे रोजी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
News - Bhandara




Petrol Price




