महत्वाच्या बातम्या

 भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक : एकाचा जागीच मृत्यू, एकजण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना गोरेगाव पोलिस ठाण्याअंतर्गत तुमसर शिवारात शनिवारी २३ सकाळी सुमारे ९:४० वाजताच्या दरम्यान घडली. वीरेंद्र हरीलाल काशिम (वय ५२, रा. ककोडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

माहितीनुसार, वीरेंद्र काशिम हे त्यांचा मुलगा शिवम काशिम (वय १७) याच्यासह दुचाकी क्रमांक सीजी २४-यू ५०४७ ने गोंदिया येथून ककोडीकडे जात होते. दरम्यान, हरदोली-मुंडीपार मार्गावरील तुमसर येथील शेतशिवाराजवळील डांबरी रस्त्यावर स्मशानभूमीकडून मुख्य रस्त्यावर येत असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ एडब्ल्यू ७८४३ च्या अज्ञात चालकाने भरधाव वेगात दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात वीरेंद्र काशिम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा शिवम हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी संध्या वीरेंद्र काशिम (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 





  Print






News - Gondia




Related Photos