पत्नीसमोरच बिबट्याचा थरारक हल्ला : शेतकरी ठार

- भंडारा जिल्ह्यातील पिलांद्री शेतशिवारातील घटना, परिसरात भीतीचे वातावरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पत्नीसमोरच दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना पवनी तालुक्यातील पिलांद्री शेतशिवारात घडली. या हल्ल्यात बाबुराव नत्थुजी पिल्लेवान (वय ५०, रा. कोदुर्ली, ता. पवनी) यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (२२ मे) दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव पिल्लेवान हे पत्नीसमवेत जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. सोबत त्यांनी जेवणाचाही डबा नेला होता. दुपारचे जेवण उरकून दोघेही गवत गोळा करण्याचे काम करत असताना अचानक शेतात दबा धरून बसलेल्या हिंस्त्र प्राण्याने बाबुराव यांच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही.
हल्ल्यानंतर संबंधित हिंस्त्र प्राणी महिलेच्या दिशेने चवताळलेल्या नजरेने पाहू लागला. प्रसंगावधान राखत बाबुराव यांच्या पत्नीने जीवाच्या आकांताने गावाकडे धाव घेत ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थ व वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बुध्दरत्न पिल्लेवान (वय २७) यांच्या तक्रारीवरून घटनेची नोंद करण्यात आली आहे.
परिसरात दहशत; वनविभाग सतर्क -
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ, बिबट आणि अस्वलांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी वर्ग धास्तावला असून वनविभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. अडयाळ वनविभाग तसेच जिल्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
वनविभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून पिंजरेही लावण्यात येत आहेत. तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन भंडाऱ्यातून शार्पशूटरलाही पाचारण करण्यात आले आहे.
मृताच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत -
वनविभागाने मृत बाबुराव पिल्लेवान यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सायंकाळी सुमारे ६ वाजता शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
हल्लेखोर प्राणी नेमका कोण? फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्टता -
प्राथमिक अंदाजानुसार बाबुराव पिल्लेवान यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला असल्याचे सांगितले जात असले, तरी हल्ला करणारा प्राणी नेमका बिबट होता की वाघ, याबाबत वनविभागाने अद्याप अधिकृत स्पष्टता दिलेली नाही.
यासाठी मृतदेहातील व्हिसेरा तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. मृतदेहावरील जखमांचे स्वरूप, नखांचे व दातांचे व्रण यांचा अहवाल आल्यानंतरच हल्लेखोर हिंस्त्र प्राणी नेमका कोणता होता, हे स्पष्ट होणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
News - Bhandara




Petrol Price




