ग्राम रोजगार सेवकांना दिलासा : ३०० कोटींच्या निधीला मंजुरी


- आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; निश्चित मानधनाचा मार्ग मोकळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत ग्राम रोजगार सेवकांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, त्यांच्या मानधनासाठी ३०० कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निधीसाठी आमदार तथा माजी मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये निश्चित मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामीण भागातील विविध विकासकामांचा लेखाजोखा ठेवणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच लाभार्थी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्राम रोजगार सेवक पार पाडतात. यापूर्वी त्यांना कामाच्या प्रमाणानुसार मानधन मिळत होते. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून ३ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य शासनाने ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये निश्चित मानधन देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला होता.
मात्र, शासन निर्णयानंतर आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने मागील २१ महिन्यांपासून ग्राम रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित होते. त्यामुळे राज्यभरातील हजारो ग्राम रोजगार सेवक आर्थिक अडचणींचा सामना करत होते. या पार्श्वभूमीवर आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येऊन पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमधून ३०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मागील २१ महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, निश्चित मानधनाच्या अंमलबजावणीसही गती मिळाली आहे.
दरम्यान, मुंबई येथे ग्राम रोजगार सेवकांचे नेते युनूस शेख यांच्या नेतृत्वात ग्राम रोजगार सेवकांच्या शिष्टमंडळाने आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मानधनाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच ग्राम रोजगार सेवकांच्या इतर प्रलंबित मागण्या आणि विविध प्रश्नांवरही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ग्राम रोजगार सेवकांच्या हितासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची ग्वाही आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो ग्राम रोजगार सेवकांना मोठा दिलासा मिळाला असून, मागील २१ महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन मिळणार असल्याने ग्राम रोजगार सेवकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या या निर्णयाचे राज्यभरातील ग्राम रोजगार सेवकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




