कमी पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी शाश्वत पीकाचे नियोजन करावे : कृषी विभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या हवामान अंदाजानुसार संपूर्ण देशात एकूण पावसाचे प्रमाण सरासरीच्या ९२ टक्के असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याचा हवामान अंदाज असून यावर्षी मान्सून १०-२० जून दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणार आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर,ज् वारी, ख. भुईमुग, मुग, उडीद, तीळ, मका तसेच इतर तृणधान्य व गळीतधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी तांत्रिक बाबींचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
खरीप पिकांची पेरणी किमान ८० ते १०० मि.मी. प्रभावी पाऊस झाल्यानंतरच करावी. अपुरा पाऊस झालेल्या स्थितीत घाईने पेरणी केल्यास उगवण व पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. सोयाबीन पिकांच्या लवकर येणाऱ्या जेएस-९३०५ सारख्या कमी कालावधीतील वाणांची बीबीएफ पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीमुळे पावसातील खंडाच्या परिस्थितीत जमिनीमध्ये आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. तूर पिकासाठी बीडीएन-७१६, भीमा, आश्लेषाव गोदावरी यांसारख्या वाणांची निवड करावी. कापूस पिकासाठी कमी कालावधीतील व अतिघन लागवडीस अनुकूल वाणांचा अवलंब करावा. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्यांनी सलग तूर, मका व सूर्यफूल यासारख्या पिकांची लागवड करण्यास प्राधान्य द्यावे.
जिरायती क्षेत्रामध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. सोयाबीन + तूर, कापूस + तूर अशा आंतरपीक पद्धतींमुळे जोखीम कमी होऊन उत्पादन स्थिर राहण्यास मदत होते.
शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी घरगुती पद्धतीने बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. यासाठी १०० बिया ओलसर कागद अथवा तागाच्या पोत्यामध्ये १० लाईन मध्येठेवून पाणी टाकून ६ ते ७ दिवस गुंडाळी करून थंड सावलीत ठेवावे. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त बियाणे उगवले असल्यास ते बियाणे पेरणीस योग्य समजावे. जिल्हा मृदा चाचणी व सर्वेक्षणकार्यालयाच्या अहवालानुसार वर्धा जिल्ह्यातील जमिनीत नत्र व स्फुरद या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकासाठी शिफारसीय अन्नद्रव्य मात्रा १२:२४:१२ एनपीके किलो एकरी तर तूर पिकासाठी युरिया -२२, सिंगल सुपर फॉस्फेट- १२५ तर म्युरेट ऑफ पोटॅश-२१ सरळ खतेकिलो/एकर आवश्यक आहे.
खतावरील खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांनी लिक्विड कन्सोर्शिया जैवखताची १० मि.ली. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे वातावरणातील नत्र २० ते ४० किलो, जमिनीतील स्फुरद १० किलोपर्यंत व पालाश २० किलो पर्यंत पिकांना उपलब्ध होण्यास मदत होते. तसेच मायकोरायझा जैवघटकामुळे मुळांची वाढ सुधारून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकामार्फत शोषण वाढते. लिक्विड कन्सोर्शिया जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा, सेलू येथे विक्रीसाठी उपलब्ध असून त्याची विक्री किंमत ४०० रुपये प्रति लिटर आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी ९४०४१५३३३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पिक वाढीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये सोयाबीन पिकाचे खोडमाशी व चक्रीभुंगा पासून संरक्षण करणे आवश्यक आहे, संरक्षण केले नसल्यास वीस ते पंचवीस टक्के नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पेरणीपूर्वीच थायोमेथाझाम १० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया केल्यास सुरुवातीचे २० ते २५ दिवस किडीपासून संरक्षण होते. कापूस पिकामध्ये मित्र कीटक ट्रायकोग्रामा एकरी ५० हजार अंडी, एकरी १० पक्षी थांबे तसेच पिकासोबतसापळा पिकाची लागवड करावी. जसे की कापूस पिकामध्ये -मका, भगर,तूर, मुग, उडीद, चवळी, तुरपिकामध्ये -एरंडी, सुर्यफुल, मका, ज्वारी, बाजरी सोयाबीनपिकामध्ये -एरंडी, सुर्यफुल, मका. मका पिकामध्ये अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी पेरणीपूर्वी कीटकनाशकची बीजप्रक्रिया करावी व पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर निरीक्षण घेऊन आवश्यकतेनुसार नियंत्रण उपाय कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार करावे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी जमिनीतील बुरशीमुळे मुळकुज, मर रोग व चारकोर राट मुळे नुकसान होण्याची शक्यताअसते. त्यामुळे दोन लिटर ट्रायकोडर्मा प्रति एकर जमिनीत टाकने आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा वर्धा येथे भेट देऊन किंवा २०० रुपये प्रति लिटर प्रमाणे विकत घेण्यासाठी ८००७७७५६१३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी प्लास्टिक मल्चिंग आणि जैविक मल्चिंग करणे आवश्यक आहे. पिकाची कोळपणी करून पिकाच्या बुंध्याशी मातीची भर द्यावी जेणेकरून ओलावा टिकून राहील. कापूस तूर मका सूर्यफूल पिकांचे रोपे दाट असल्यास विरळणी करून संख्या मर्यादित ठेवावी. शेताच्या बांधावर शेवरी व सुपरनेपियर या वारा प्रतीरोधक झाडांची लागवड करण्यात यावी.
ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे ताण पडल्यास पिकाचा ताण कमी करण्यासाठी १०० लिटर पाण्यात २ किलो युरिया किंवा २ किलो डीएपी खताची फवारणी करावी. फळझाडे, भाजीपाला, तेलबिया व अन्नधान्य पिकांवर कमी पाऊस असल्यास पाण्याचा ताण पडणे रोखण्यासाठी केवोलिन ८ टक्के ची फवारणी किंवा पोटॅशियम नायट्रेट दोन टक्के ची फवारणी शेतकरी बांधवांनी केल्यास फायदेशीर ठरते.
कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र व स्थानिक कृषि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार शास्त्रोक्त पद्धतीने खरीप हंगामाचे नियोजन करावे तसेच नियोजन करतांना कृषि विभागाच्या महाविस्तार ए. आए. ॲपचावापर करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




