महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरीचा प्रयत्न : सीसीटीव्हीची वायरिंग तोडून १० हजारांचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बँकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची वायरिंग आणि प्रवेशद्वारावरील दिव्याची तोडफोड करून सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान केल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी शाखा अधिकारी आकाश सुखदेवराव मोहिनकर ( यांनी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राप्त माहितीनुसार, १६ मे रोजी सायंकाळी बँक बंद करून कर्मचारी घरी गेले होते. त्यानंतर १८ मे रोजी सकाळी बँकेचे कॅशियर श्रीधर मते व कंत्राटी कर्मचारी संजय बोरकर बँकेत पोहोचले असता मुख्य दरवाजा व चॅनल गेटचे कुलूप तुटलेले आढळून आले. चॅनल गेट अर्धवट उघडे असल्याचेही निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी शाखा अधिकाऱ्यांसह बँकेची पाहणी केली असता, सेफ रूममधील ६ लाख २८ हजार ८०२ रुपये रोख रक्कम सुरक्षित असल्याचे आढळले. मात्र, बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआरची वायरिंग तोडण्यात आली होती. तसेच प्रवेशद्वारावरील दिव्याचीही तोडफोड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

प्राथमिक तपासात अज्ञात आरोपींनी १६ मेच्या सायंकाळपासून १७ मेच्या सकाळी दरम्यान बँकेत घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चोरी करण्यात आरोपींना यश आले नसले तरी त्यांनी तोडफोड करून नुकसान केले आहे.

चिमूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून परिसरातील हालचालींची माहिती व इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos