कमलापूर सरपंचाचा ई-निविदा प्रकरणावर आक्षेप : ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा असल्याचा आरोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : कमलापूर ग्रामपंचायत हद्दीतील विविध अंगणवाडी केंद्रांच्या बांधकाम व दुरुस्ती कामांसंदर्भात विभागाने पूर्वसूचना न देता ई-निविदा काढल्यामुळे सरपंच रजनीता मडावी यांनी आक्षेप घेतला आहे. या घटनेला त्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर हल्ला मानत तात्काळ निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.
सरपंच रजनीता मडावी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या विविध अंगणवाडी केंद्रांच्या बांधकाम/दुरुस्ती कामांसंदर्भात कोणतीही पूर्वसूचना, परवानगी किंवा पत्रव्यवहार न करता संबंधित विभागामार्फत थेट ई-टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत खेदजनक असून ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा आणणारी आहे.
सरपंचाच्या म्हणण्यानुसार, कमलापूर ग्रामपंचायत नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने सर्व कामे करण्यास सक्षम आहे. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेला वगळून थेट निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारांचा भंग झाल्याचा आरोप केला आहे.
रजनीता मडावी यांनी या प्रकरणात स्पष्ट केले की, सदर टेंडर तात्काळ रद्द करावे व अंगणवाडीची सर्व कामे ग्रामपंचायतीला सुपूर्द करावी, अन्यथा ग्रामपंचायत आपल्या हक्कासाठी न्यायालयाचे दार ठोठावेल.
स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायत या प्रकरणावर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




