महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यात अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई : दोन ठिकाणी गुन्हे दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात अनधिकृत व संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या साठवणूक आणि विक्रीविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत शेगाव बु. आणि गोंडपिपरी येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध बियाणे अधिनियमासह विविध कायद्यांअंतर्गत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात शेगाव बु. पोलीस स्टेशन हद्दीत कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक मारोती संतोषराव वरभे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मौजा रोगाव येथील मितेश किशोर पारोधे यांच्या राहत्या घरी भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी दोन पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा आढळून आला. तपासणीदरम्यान CHHAVA आणि TRUST नावाच्या बियाण्यांच्या एकूण ९६ पाकिटांचा साठा जप्त करण्यात आला. प्रत्येकी ४५० ग्रॅम वजनाच्या या पाकिटांची एकूण किंमत सुमारे ८६ हजार ४९६ रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या बियाण्यांवर उत्पादक, विक्रेता, लेबल, परवाना आणि जीईएसी मान्यतेसंबंधी आवश्यक माहिती नसल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची तक्रार कृषी विभागाने दिली आहे.

दुसऱ्या प्रकरणात गोंडपिपरी तालुक्यातील वढोली-विठ्ठलवाढा मार्गावरील फुडीहेटी फाट्यावर कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे मोटारसायकलवरून संशयित एचटीबीटी बियाण्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींमध्ये प्रकाश यादव ताजणे (रा. चिचबोली, ता. राजुरा) आणि राजेंद्र खुशाबराव ठेंगणे (रा. नादगाव, ता. गोंडपिपरी) यांचा समावेश आहे.

त्यांच्याकडून Powar, Captain ५G आणि ३ Akka नावाची संशयित कापूस बियाण्यांची एकूण ६० पाकिटे व डबे जप्त करण्यात आले. सुमारे ६० हजार रुपये किमतीची बियाणे तसेच ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात बियाणे नियंत्रण आदेश १९८३, बियाणे अधिनियम १९६६, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केले.

जिल्ह्यात अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची विक्री आणि साठवणुकीविरोधात कृषी विभागाने कठोर भूमिका घेतली असून शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत व प्रमाणित बियाण्यांची खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos