चामोर्शीत दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

- २६३ लाभार्थ्यांची तपासणी; १०० जण दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पात्र
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : ग्रामीण भागातील दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविताना प्रवास, प्रशासकीय प्रक्रिया व वैद्यकीय तपासणीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयाद्वरे ०९ मे २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी व प्रमाणपत्र प्रक्रियेचा लाभ मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
चामोर्शी तालुका व परिसरातील दिव्यांग नागरिकांना या शिबिराचा मोठा लाभ मिळाला. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांची सखोल व आस्थेने तपासणी करण्यात आली.
शिबिरामध्ये औषधवैद्यक विभागामार्फत ९५ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६५ लाभार्थी प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले. अस्थिव्यंग विभागात ११५ जणांची तपासणी करण्यात येऊन २७ जण पात्र ठरले. नेत्ररोग विभागात २२ लाभार्थ्यांची तपासणी होऊन २ जण पात्र ठरले, तर बालरोग विभागात १७ तपासण्यांपैकी ४ लाभार्थी पात्र आढळले. नाक-कान-घसा विभागात १४ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येऊन २ जण प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले. अशा प्रकारे एकूण २६३ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १०० लाभार्थी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले आहेत.
शिबिरादरम्यान पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्र प्रक्रियेची पुढील माहिती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांच्या मुख्य प्रवाहात आणणे व त्यांची होणारी गैरसोय कमी करणे या दृष्टीने हे शिबिर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.
या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डॉ. आय. जी. नागदेवते उपस्थित होते. उद्घाटक म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी येरमे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका दिव्यांग प्रतिनिधी चंदन खरवडे उपस्थित होते. तसेच डॉ. प्रविणकुमार किलनाके, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चामोर्शी, डॉ. महेंद्र पेद्दाला, तालुका आरोग्य अधिकारी चामोर्शी, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील डॉ. छाया उईके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. अमिरिष त्रिवेदी, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क), डॉ. उल्हास सरोदे, नेत्रतज्ज्ञ, डॉ. तारकेश्वर उईके, बालरोग तज्ज्ञ, डॉ. अनिरुद्ध वेद्य, अस्थिव्यंग उपचार तज्ज्ञ, डॉ. दिक्षा सोनारखळ, भौतिक उपचार तज्ज्ञ, डॉ. बिधान देऊरी, डॉ. केतन तलमले, अजय खैरकर, वैद्यकीय मानसोपचार तज्ज्ञ, संदीप मोटघरे, कान-नाक-घसा विभाग, तसेच मोहित हर्षे व मेघा ठेंगणे, नेत्र विभाग यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समिती चामोर्शी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने शिबिराचे कामकाज पार पडल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमास आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला व आरोग्य विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील दिव्यांग नागरिकांसाठी आरोग्य सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न निश्चितच आशादायी ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
News - Gadchiroli




Petrol Price




