महत्वाच्या बातम्या

  कृषि विज्ञान केंद्र साकोली मार्फत उन्हाळी तीळ पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन


- तिळाची लागवड करुन अधिक उत्पन्न घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली मार्फत राष्ट्रीय खाद्यतेल व तेलबिया अभियान अंतर्गत उन्हाळी तीळ पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळी तीळ लागवडीसाठी भंडारा जिल्ह्यामध्ये उन्हाळी धानाला पर्याय म्हणून हे उत्तम पीक आहे. शेतकरी बांधवांनी उन्हाळी धानाला पर्याय म्हणून तिळाची लागवड करून अधिक उत्पन्न मिळवावे असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ व कृषि विज्ञान केंद्र प्रमुख साकोली डॉ.उषा डोंगरवार यांनी केले आहे.

भंडारा जिल्ह्यामध्ये तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय खाद्यतेल व तेलबिया अभियान (NMEO-OS) अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली मार्फत २० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी तीळ पिक प्रात्याक्षिके राबविण्यात आले आहे.

यामध्ये तिळाचे सुधारित वाण, बीजप्रक्रिया, सुधारित लागवड तंत्रज्ञान, माती परीक्षण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग, एकात्मिक तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान या बाबींचा अवलंब करून उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होत आहे.

कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील शास्त्रज्ञांकडून तीळ पीक प्रत्यक्षिकामध्ये सहभागी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषि विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.उषा डोंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.प्रशांत उंबरकर, प्रमोद पर्वते, कांचन तायडे, डॉ.प्रविण खिरारी व योगेश महल्ले यांनी जांभोरा व किसनपूर या गावामधील तीळ पीक प्रात्यक्षिकांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी शेतकऱ्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मक किड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात आली. तीळ पिकाची पाहणी दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या.





  Print






News - Gondia




Related Photos