बल्लारपूर नगरपरिषदेची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर : आपचा प्रशासनावर घणाघात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर नगरपरिषदेच्या आरोग्य सेवांचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. शहरातील रुग्णवाहिका, शववाहिका आणि फ्रीजर सुविधांच्या दुरवस्थेविरोधात आपच्या वतीने मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत निशाणा साधला. नगरपालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते, मात्र त्या सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. संकटकाळातही सुविधा उपलब्ध नसतील, तर अशा प्रशासनाचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शहरात मृत्यू झाल्यास नागरिकांना नगरपरिषदेच्या सेवांऐवजी सामाजिक संस्थांवर अवलंबून राहावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नगरपरिषदेकडे ३ ते ४ फ्रीजर उपलब्ध असूनही ते वारंवार बंद अवस्थेत असतात. तसेच रुग्णवाहिकेसाठी चालक उपलब्ध नसणे किंवा वाहन नादुरुस्त असणे, या समस्या सातत्याने समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यंत्रणा उपलब्ध असूनही वेळेवर सेवा न मिळणे हे प्रशासनाचे अपयश आहे. ९९ टक्के नागरिकांना या सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे पुप्पलवार यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, शहरातील निवडून आलेले नगरसेवक व नगराध्यक्ष सभागृहात कार्यरत असल्याने या दिरंगाईबाबत त्यांनीही उत्तरदायी राहिले पाहिजे, असे आपने स्पष्ट केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने व्यवस्था सुधारली नाही, तर मृतांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागेल, असा इशाराही देण्यात आला.
निवेदनाद्वारे पुढील १५ दिवसांत नगरपरिषदेच्या सभेत रुग्णवाहिका व फ्रीजर सुविधा कार्यान्वित करण्याचा ठराव मंजूर करून त्या तात्काळ जनतेसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रवि पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, अजयपाल सूर्यवंशी, सुशील वासेकर, शेखर तेलरांधे, इम्तियाज खान यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




