महत्वाच्या बातम्या

 भिवापूरजवळील धामणगावात भीषण आग, ५० घरे जळून खाक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भिवापूर : भिवापूरपासून सुमारे १५ किमी अंतरावरील धामणगाव (विद्या मंदिर) येथे शनिवारी (२) सायंकाळी ६:३० वाजता भीषण आग लागली. या आगीत तब्बल ५० हून अधिक घरे जळून खाक झाली असून, अनेक कुटुंबे अन्न आणि कपड्याशिवाय उघड्यावर राहायला भाग पाडली गेली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गावालगतच्या शेतात कुणीतरी कचरा जाळण्यासाठी वणवा पेटवला होता. दिवसभर धुमसत असलेल्या या आगीने सायंकाळी ६:३० च्या सुमारास रुपेश रामटेके यांच्या घराला लागून संपूर्ण वस्तीवर रौद्र रूप धारण केले. घरांना लागलेली घरे आणि उन्हाळ्यामुळे वाळलेला पालापाचोळा यामुळे आगेला इंधन मिळाले आणि काही क्षणांतच तांडव सुरू झाला.

ग्रामस्थांनी मिळेल त्या साहित्याने आणि पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्वाळा इतक्या भयानक होत्या की कोणाचेही प्रयत्न निष्फळ ठरले. घर वाचवा, जनावरे वाचवा अशा आक्रोशाने संपूर्ण गाव हादरले. आगीत अडकलेल्या दोन-चार मुक्या जनावरांचा जागीच मृत्यू झाला. काहींच्या सायकली, दुचाकी आणि हक्काचे ऑटो लोखंडाच्या सांगाड्यात रूपांतरित झाले.

घटनेचे गांभीर्य ओळखून भिवापूर, उमरेड, भीसी आणि शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवल्या गेल्या. पण त्या पोहोचण्याअगोदरच गावाचा निम्मा भाग राखरंगोळीत झाला होता. रात्री ९:३० वाजताच्या सुमारास आग वर काही प्रमाणात नियंत्रण मिळाले, परंतु तब्बल ५० संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.

घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे, राजू पारवे, रोहित पारवे आणि सभापती तुळशीदास श्रीरामे तातडीने धामणगाव पोहोचून पीडितांना धीर देत मदतीचा हात पुढे केला. मात्र, या भीषण आगीत सामान्य कुटुंबांच्या आयुष्याची जी राखरांगोळी झाली आहे, ती भरून काढणे आता मोठे आव्हान ठरले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos