महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत खरीप हंगाम नियोजनाला वेग : डिजिटल मॅपिंग वर भर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : येथील नियोजन भवनात राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा सह-पालकमंत्री ना. अ‍ॅड. आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा व खत नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत जिल्ह्यातील कृषी विकास अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी विविध धोरणात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनाप्रमाणेच कृषी क्षेत्रातही सूक्ष्म नियोजनाची गरज अधोरेखित करत संपूर्ण जिल्ह्याचे डिजिटल मॅपिंग करण्यावर भर देण्यात आला. यामध्ये सिंचन सुविधांची उपलब्धता, पडीक जमिनीचे प्रमाण तसेच प्रत्यक्ष घेतल्या जाणाऱ्या पिकांची अचूक माहिती संकलित करून एक सुसंगत डेटाबेस तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील कोणत्या भागात सेंद्रिय शेतीस अधिक वाव आहे, तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ यांचे वास्तव विश्लेषण करणे शक्य होणार आहे. केवळ खते व बियाणे पुरवण्यापुरते मर्यादित न राहता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक नफा देणारी आणि शाश्वत करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बैठकीला खासदार डॉ. नामदेवजी किरसान, माजी आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos