महत्वाच्या बातम्या

 कुरखेडा नगर पंचायतमध्ये सफाई कामगारांचा बेमुदत आंदोलन तीव्र : प्रशासनावर सर्वपक्षीय संताप


- २ दिवसांत समाधान न मिळाले तर टाळे ठोको आंदोलनाची धमकी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : नगर पंचायतमध्ये कार्यरत सफाई कामगारांचे थकीत वेतन आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात सुरू असलेले बेमुदत आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. २३ एप्रिलपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आज आजाद समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकपा) आणि आम आदमी पक्ष (आप) यांनी पाठिंबा दिला.

आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, माकपा जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार, आणि आप जिल्हाध्यक्ष नासिर हाश्मी यांनी नगर पंचायतवर धडक देत प्रशासनाला जबाब देण्याची मागणी केली. त्यांनी कामगारांच्या मागण्यांना प्रबल पाठिंबा देत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

नेत्यांच्या पाहणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सफाई कामगारांची नियुक्ती करताना कोणतीही अधिकृत टेंडर प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. नियमानुसार टेंडर काढून किमान वेतन कायद्याच्या तरतुदीनुसार कामगारांची नेमणूक करणे आवश्यक असताना, प्रशासनाने मनमानी करत कामगारांना जबरदस्तीने बचत गटांमध्ये समाविष्ट केले, त्यांच्या नावावर खाते उघडले आणि अत्यल्प मानधन दिले. या मानधनाच्या कायदेशीर आधाराविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

यासोबतच, टेंडर प्रक्रिया न झाल्यामुळे कामगारांचे EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) जमा होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेत्यांनी या प्रकरणाला बेकायदेशीर आणि कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारे असल्याचे ठामपणे सांगितले.

मागील दोन महिन्यांचे वेतन थकीत असूनही नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांनी सात दिवस उलटूनही आंदोलनकर्त्यांची साधी भेट घेतलेली नाही किंवा कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. पदाधिकारी आणि अधिकारी संपर्क टाळत असून फोन कॉल्स उचलले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे कामगारांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर आसपा, माकपा आणि आपच्या नेत्यांनी प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे की, पुढील दोन दिवसांत कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर नगर पंचायतवर टाळे ठोको आंदोलन करून तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच संपूर्ण टेंडर प्रक्रियेतील घोळ तपासून उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि संबंधित सीईओ व जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, सफाई कामगारांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos