महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात खते व बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करण्याचे नियोजन करा : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


- जिल्हा खरीपपूर्व आढावा बैठकीचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : बोगस बियाणे आणि खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने सतर्क राहावे आणि दोषींवर कडक कारवाई करावी. शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात खते व बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करण्याचे नियोजन करावे. उन्हामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई पाहता, खरीप हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हा खरीपपूर्व आढावा बैठकीचे आयोजन सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिका-यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, प्रकल्प संचालक (आत्मा) डॅा. अर्चना कडू यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यात संसाधनांची कमतरता नाही तसेच शेतकरीही प्रगतीशील आणि कल्पक आहेत. त्यामुळे विभागाने कृषी विकासासाठी लघुकालीन आणि दीर्घकालीन कार्यवाहीकडे लक्ष द्यावे. बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी करीत कारवाई करावी. नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण आणि त्यासाठी परिसंस्था निर्माण केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला चालना मिळणार नाही. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

बोगस बियाणे तपासणी आणि खतांची विक्री सुरळीत होण्यासाठी तालुका स्तरावर फ्लाईंग स्क्वॅाडची निर्मिती, तसेच पात्र शेतक-यांना पीक विमा यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पात्र शेतक-यांना पीक विम्याचा लाभ  मिळालाच पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, राष्ट्रीय कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, कृषीपंप वीजजोडणी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून देण्यात आलेली मदत आदी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी सादरीकरणाद्वारे दिली.





  Print






News - Nagpur




Related Photos