देशात साखरेचे उत्पादन घटले, महाराष्ट्रात १० लाख टन कमी : निर्यात आणि इथेनॉलकडे वळवले जाणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशात ३५० लाख टन, तर महाराष्ट्रात ११० लाख टन साखरेचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, हंगामाच्या मध्यात येताना उत्पादन कमी होऊन देशात २८३–२८५ लाख टन आणि महाराष्ट्रात १०० लाख टन राहणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ९८.८७ लाख टन, तर देशात २७१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्यातील गाळप हंगाम पुढील ८–१० दिवसांत संपण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती -
यंदा राज्यातील २१० सहकारी व खासगी कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली होती. त्यापैकी १८७ कारखान्यांची धुराडी बंद झाली असून उर्वरित २३ कारखाने पुढील ८–१० दिवसांत बंद होतील.
आतापर्यंत १,०४३ लाख टन उसाचे गाळप झाले असून ९८.८७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ९.४८% नोंदला गेला आहे.
सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात (२३.१९ लाख टन), पुणे विभागात (२२.१८ लाख टन) आणि सोलापूर विभागात (१९ लाख टन) झाले आहे.
अंदाजित साखर उत्पादनापेक्षा राज्यात सुमारे १० लाख टन कमी उत्पादन होणार आहे.
उत्तर प्रदेशातील परिस्थिती -
सुरुवातीला १०५ लाख टन उत्पादनाचा अंदाज होता, परंतु नवीन अंदाजानुसार उत्पादन ९३ लाख टनांपर्यंत पोहचणार आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.
इथेनॉल आणि निर्यात -
यंदा देशात ३१ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या परवानगीने सात ते आठ लाख टन साखरेची निर्यात होणार आहे.
देशातील एकूण स्थिती -
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये गाळप हंगाम लवकरच संपणार आहे.
यापुढील गाळपातून साखरेचा उतारा कमी राहणार असून, देशातील उत्पादनात घट झाल्याने काही प्रमाणात साखरेचा पुरवठा इथेनॉल व निर्यातीसाठी वळवला जाणार आहे.
News - World




Petrol Price




