लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीची ३१ मार्च अखेरची संधी


- मुदतीत ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना झालेल्या त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्ती ३१ मार्च पर्यंत करता येणार आहे. दुरुस्तीची ही अंतिम संधी असल्याचे महिलांनी मुदतीत ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यामध्ये लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी स्वरूपात सरकारी विभाग, शासकीय उपक्रम, महामंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नसणे, तसेच सेवानिवृत्तीनंतर कोणताही सदस्य निवृत्तीवेतन घेत नसणे या अटींबाबत चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले होते. या कारणामुळे अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर शासनाने अशा अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया चुकीच्या पर्यायामुळे अपूर्ण राहिली किंवा त्या अपात्र ठरल्या आहेत, त्यांनी या कालावधीत आपली माहिती काळजीपूर्वक तपासून दुरुस्त करणे आवश्यक आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३१ मार्च ही अंतिम संधी आहे. या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा करण्याची मुभा दिली जाणार नाही. त्यामुळे महिलांनी मुदतीत ई-केवायसी दुरुस्ती करून योजनेचा लाभ निश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
News - Wardha




Petrol Price




