महत्वाच्या बातम्या

 ई-पिक पाहणीत आष्टी तालुक्याची उल्लेखनीय कामगिरी


- बोरखेडी व चामला गावांत १०० टक्के ई-पिक पाहणी पूर्ण
- पोलिस पाटलांचा विशेष गौरव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : खरीप हंगाम २०२६-२७ मधील ई-पिक पाहणी मोहिमेत आष्टी तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील बोरखेडी व चामला या गावांमध्ये १०० टक्के ई-पिक पाहणीचे काम पूर्ण झाले असून जिल्ह्यात १०० टक्के ई-पिक पाहणी पुर्ण करणारी ही पहिली गावे ठरली आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्या हस्ते दोन्ही गावांतील पोलिस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पिक पाहणी मोहिमेंतर्गत खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ऑनलाइन नोंद करणे आवश्यक आहे. आष्टी तालुक्यात ई-पिक सहाय्यकांच्या माध्यमातून डीसीएचएमएच या मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांच्या पिकांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे.

बोरखेडी व चामला गावांमध्ये ग्रामपातळीवरील पोलिस पाटलांनी ग्राम महसूल अधिकारी, ई-पिक सहाय्यक तसेच शेतकऱ्यांशी समन्वय साधत ही मोहिम प्रभावीपणे राबविली. बोरखेडी येथील पोलिस पाटील प्रणीता धनराज लोमटे यांनी गावातील सर्व शेतकऱ्यांची १०० टक्के ई-पिक पाहणी पुर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच चामला येथील पोलिस पाटील गंगाधर बिटने यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला भेट देत ई-पिक पाहणी पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. दोन्ही पोलिस पाटलांनी गावकऱ्यांशी उत्तम समन्वय साधून उद्दिष्ट वेळेत पूर्ण केले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ई-पिक पाहणीसाठी १० नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. मुदत संपण्यास अवकाश असला तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी विलंब न करता आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अथवा ई-पिक सहाय्यकांशी संपर्क साधावा. आपल्या शेतातील पिकांची नोंदणी विहित वेळेत पुर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी केले आहे.

 





  Print






Related Photos