राऊळगाव येथील स्फोटप्रकरण : आणखी दोन महिलांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या ‘एसबीएल कंपनी लिमिटेड’मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र अद्यापही सुरूच आहे. उपचाराधीन असलेल्या आणखी दोन महिलांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या आम्रपाली काळसर्पे वय ३६, रा. राऊळगाव, ता. काटोल यांचा ७ मार्च रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या सुमारे ५५ टक्के भाजल्या होत्या. स्फोटानंतर पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते.
तसेच रोशनी सूर्यकांत उमाठे वय ३२, रा. दुधाळा यांचा ८ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या सुमारे ७५ टक्के भाजल्या होत्या. त्यांच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले होते तसेच पायांवर शस्त्रक्रिया करून एक्सटर्नल फिक्सेशन करण्यात आले होते.
दरम्यान, नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सध्या १४ महिला उपचार घेत आहेत. त्यापैकी दोन महिलांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
गंभीर रुग्णांमध्ये सुजाता विनायक रक्षीत ३५ व सीमा विजय धुर्वे २७ या दोघी सुमारे ७० टक्के भाजल्या आहेत, तर ज्योती शामू धुर्वे २१ या ६५ टक्के भाजल्या असून या तिन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय दुर्गा मनोज घाटगे ६० टक्के, उषा बालाजी रेवतकर ५० टक्के, मयुरी धुर्वे ४५ टक्के, मनीषा धुर्वे ४५ टक्के, काजल कोरती व रितू सलाम प्रत्येकी ४० टक्के, कविता उईके ३५ टक्के, सुनीता उईके (३० टक्के) आणि वैशाली धुर्वे १५ टक्के या महिलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तसेच अल्प जखमींमध्ये वैशाली सटई आणि रोशनी मसराम या दोघी सुमारे ५ टक्के भाजल्या असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
या भीषण स्फोटामुळे परिसरात शोककळा पसरली असून अनेक जखमी अजूनही मृत्यूशी झुंज देत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
News - Nagpur




Petrol Price




