पोर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात : विविध शासकीय सेवांचा लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर (टप्पा १) ला भेट देत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विविध विभागांच्या स्टॉल्सची पाहणी केली व लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला.
यावेळी बोलताना आमदार डॉ. नरोटे यांनी सांगितले की, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन प्रशासनाच्या माध्यमातून थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचत आहे. या शिबिरात एकाच छताखाली नागरिकांना जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा २) आणि डिजिटल ७/१२ यांसारख्या महत्त्वाच्या सेवांचे वितरण करण्यात आले.
आता डिजिटल ७/१२ ला पूर्णतः कायदेशीर मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांना स्वाक्षरीसाठी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याची गरज उरलेली नाही. महसूल सेवांसोबतच आरोग्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण काम सुरू असून आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्येही मोफत उपचार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच या परिसरातील शेती सुजलाम-सुफलाम करण्यासाठी वसापूर उपसा सिंचन योजना प्राधान्याने राबविण्याचा संकल्प शासनाने केला असल्याचेही आमदार नरोटे यांनी सांगितले. प्रशासन आणि शासन यांच्या समन्वयातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास व न्याय पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, गडचिरोलीचे तहसीलदार सागरजी कांबळे, गट विकास अधिकारी अनिकेतजी पाटील तसेच नायब तहसीलदार चंदुजी प्रधान उपस्थित होते
News - Gadchiroli




Petrol Price




