महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली शोकमग्न : ज्येष्ठ नेते मुक्तेश्वरजी काटवे यांना भावपूर्ण निरोप


- माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची अंत्यविधी ला उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहराच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनात आपली वेगळी छाप उमटविणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, गडचिरोली नगरपरिषदचे आरोग्य व स्वच्छता सभापती तथा नगरसेवक मुक्तेश्वरजी काटवे यांचे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण गडचिरोली शहर शोकसागरात बुडाले असून जनजीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी प्रामाणिकपणे, निस्वार्थ भावनेने दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. स्वच्छता, आरोग्य आणि नगरविकासाच्या कामात त्यांनी दाखविलेली तळमळ व बांधिलकी ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. माजी शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.

त्यांच्या पार्थिवावर आज २८ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी दुपारी १:०० वाजता वैनगंगा नदी, बोरमाळा घाट, गडचिरोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी, नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते.

अंत्यविधीप्रसंगी आयोजित शोकसभेत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मुक्तेश्वरजी काटवे यांचे कार्य, त्यांचा साधा व मनमिळावू स्वभाव आणि समाजाप्रती असलेली निष्ठा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने भाजप परिवारासह गडचिरोली जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी माजी आमदार तथा प्रदेशाध्यक्ष आदिवासी मोर्चा डॉ. देवरावजी होळी, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, डॉ. नितीन कोडवते, राष्ट्रवादी नेते रविंद्र वासेकर, उपनगराध्यक्ष निखिल चरडे, सभापती अनिल कुनघाडकर, हर्षल गेडाम, नगरसेवक सागर निंबोरकर, लिलाधर भरडकर, रमेशजी भुरसे, प्रमोद पिपरे, विलास पा.भांडेकर, आनंद भांडेकर, डॉ. भारत खटी, अनिल पोहनकर, सुधाकर व गजानन येंगदवार, अरुण भांडेकर, चंद्रशेखर भंडागे, प्रकाश ताकसांडे, भास्कर बुरे, रेवनाथ कुसराम, प्रकाश निकुरे, नितेश /बंटि खडसे, दिनेश नवघडे, कावडेजी आदी मान्यवर उपस्थित होते. शोकसभेचे प्रास्ताविक व संचालन नगरसेवक रमेश चौधरी यांनी केले.

सभेदरम्यान दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून त्यांच्या स्वभावातील साधेपणा, कर्तव्यदक्षता आणि लोकांशी असलेली आत्मीयता यावर प्रकाश टाकला. यासोबतच नायब तहसिलदार अनिल  भांडेकर यांच्याही अंत्यविधी ला मा.खा.डॉ. नेते यांनी उपस्थिती राहुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहली.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व काटवे यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच सर्वांची प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली! 





  Print






News - Gadchiroli




Related Photos