महत्वाच्या बातम्या

 गाव तिथे स्मशान भूमी उपक्रमांतर्गत १५ मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर : गाव तिथे स्मशानभूमी अंतर्गत जिल्ह्यात असलेल्या शासकीय जमिनीवर स्मशान भूमी बांधण्यासाठी सर्व तहसीलदारांनी गटविकास अधिकारी यांच्या समन्वयाने पुढाकार घेतला पाहिजे. तालुक्यातील ज्या गावात स्मशानभूमी नाही, अशा गावांची यादी तयार करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी कालबध्द नियोजन करणे आवश्यक आहे.

यात ज्या गावात झुडपी जंगल आहे तिथे वनविभागाशी चर्चा करावी व ज्या गावात यापैकी पर्याय नसेल तर खाजगी मालकाशी संपर्क साधून १५ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन भवन येथे विविध विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, उपवनसंरक्षक  विनीता व्यास, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

येत्या १० मार्च पासून प्रत्येक तहसीलस्तरावर ऑनलाईन सुनावणी सुरु करावयाची आहे. यासाठी सर्व तहसील कार्यालयातील सुविधा अद्ययावत केल्या पाहिजेत. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना तहसील कार्यालयात ये-जा करण्याची आवश्यकता भासणार नाही.

अद्ययावतीकरणासाठी लागणारा निधी हा जिल्हा विकास निधीतून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

तुकडेबंदी कायद्यांतर्गत लोकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी लवकरच एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येऊन फसवणूकीबाबत त्यांना जागृत करण्यात येईल व कायद्याचे उल्लंघन होणार नाही. यात जिल्हास्तरावर व उपविभागीय स्तरावर समितीचे गठन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात नरखेड व काटोल तालुक्याला नेहमी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यानुषंगाने आतापासूनच नवीन बोरवेल टँकरबाबत नियोजन करावे. स्त्रोत बळकटीकरण योजनेंतर्गत कामांना गती द्यावी. तसेच येत्या जूनपर्यत रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज अभियान १८ फेब्रुवारीपासून सुरु झाले असून मे महिन्यापर्यंत सुरु रहाणार आहे. यासाठी आयोजित कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना निमंत्रीत करुन अधिकाधिक लोकांचा सहभाग घेतला पाहिजे. तेथील कामे यातून गावस्तरावरच पूर्ण होतील. यावेळी विविध विभागांनी आपले स्टॉल लावून नागरिकांना माहिती व सुविधांचा लाभ द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. पाम्पलेट, झिंगल्स, व्हिडीओद्वारे ग्रामीण भागात जनजागृती करावी. सोशल मिडीयावर सुध्दा जनजागृती करावी, असे ते म्हणाले.

यावेळी झुडपी जंगल, वेणा प्रकल्प, नगर परिषद व पंचायती अंतर्गत स्वामित्व योजना, गाव तिथे स्मशानभूमी, मिशन स्वास्थ प्लस, मंडळस्तरावरील क्रीडांगण, तुकडेबंदी कायदा, महाराजस्व अभियान, टंचाई / पाणी पुरवठा, महावितरण, पाटबंधारे, ऑनलाईन हिअरींग, निवडणूक विषयी आढावा घेण्यात आला. सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषद व पंचायतीचे मुख्याधिकारी व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.  





  Print






News - Nagpur




Related Photos