पक्षीय राजकारण विसरून शहर विकासासाठी हातमिळवणी करा : आमदार डॉ. मिलिंद नरोटे


- गडचिरोलीत ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीनचे लोकार्पण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहराच्या स्वच्छतेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले. कर्तव्य कक्ष कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात नगरपरिषदेच्या नगरसेवकांचा सत्कार तसेच अत्याधुनिक ‘ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन’चे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ आणि आधुनिक महाराष्ट्र या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन गडचिरोली शहरातही आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला ध्यास असल्याचे आ. नरोटे यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ५० वर्षांच्या रोडमॅपमधील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.
लॉइड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सामाजिक दायित्वातून (CSR) ही मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मशीनसाठी लागणारे इंधन, चालक आणि संपूर्ण व्यवस्थापन कंपनीमार्फत केले जाणार असून नगरपरिषद केवळ देखरेख करणार आहे. यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाचे आ. नरोटे यांनी आभार मानले.
आपण सर्वजण १ लाख गडचिरोलीकरांचे प्रतिनिधी आहोत. शहराच्या स्वच्छतेसाठी आणि विकासासाठी एकजुटीने काम करणे ही काळाची गरज आहे, असे सांगत त्यांनी नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्या व विकासाच्या गरजा प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
आगामी काळात शहरासाठी सक्षम ड्रेनेज व्यवस्था, आधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि इतर प्रगत यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री (अनु. जमाती) डॉ. अशोक नेते, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लॉइड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे उपाध्यक्ष नटराजन, भाजपा शहराध्यक्ष तथा बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, आरोग्य व स्वच्छता सभापती मुक्तेश्वर काटवे तसेच नगरसेवक व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




