महत्वाच्या बातम्या

 सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ : महाराष्ट्राला लाभल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री


- राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड

- उत्पादन शुल्क, क्रीडा व अल्पसंख्याक विकास ही तीन खाती मिळाली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यासह सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

शपथविधीनंतर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून अजित दादा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते उपस्थित होते.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीचा प्रस्ताव दिलीप वळसे-पाटील यांनी मांडला, तर छगन भुजबळ यांनी त्यास अनुमोदन दिले.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती सोपविण्यात आली आहेत. अजित पवारांकडे असलेली वित्त व नियोजन ही महत्त्वाची खाती सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत.

या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos