महत्वाच्या बातम्या

  गोरेवाडा-पिटेसूर रोडवर मध्यरात्री दरोडेखोरांचा हैदोस : विरोध करणाऱ्या ऑटोचालकाची चाकूने हत्या



- वाहनचालकांना लुटले; दोघे जखमी, सात आरोपी ताब्यात; नागपुरात संतापाचे वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : उपराजधानी नागपुरातील पिटेसूर–गोरेवाडा मार्गावर शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घालत वाहनचालकांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या ऑटोचालकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली, तर अन्य दोघांना चाकूने जखमी करण्यात आले. या घटनेमुळे नागपुरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत ऑटोचालकाचे नाव मोहम्मद काशिफ मोहम्मद रफिक असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री मोहम्मद काशिफ हा आपल्या ऑटोमधून कॅटरिंगचे काम करणाऱ्या नऊ जणांना घेऊन गोरेवाडा रिंगरोडमार्गे मोमिनपुरा येथे जात होता. यावेळी पिटेसूर–गोरेवाडा रोडवर दबा धरून बसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांचा ऑटो अडविला. आरोपींनी शिवीगाळ करत ऑटोतील प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून रोख रक्कम, दागिने, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मोहम्मद काशिफ यांनी विरोध करताच आरोपींनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या काशिफ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच कमलेश जडिया आणि स्विगी डिलिव्हरी बॉय निखिल चौधरी यांनीही विरोध करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावरही चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघांच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त आयुक्त विनिता साहू, उपायुक्त गुन्हे दीपक अग्रवाल तसेच उपायुक्त राहुल मदने यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर १०० हून अधिक पोलिसांचे विशेष पथक परिसरात शोधमोहीम राबविण्यात आले.

या कारवाईत राज उर्फ सुलभ धर्मेंद्र ठाकूर, नवीन उईके, समीर उईके, यश गावंडे, संजय जोगी, रोहित जगदाळे तसेच एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी गोरेवाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी राज उर्फ सुलभ धर्मेंद्र ठाकूर याच्यावर यापूर्वीही हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. काही आरोपी पोलिसांचे खबरे टिपर म्हणून काम करत असल्याची चर्चा असून, त्यांच्या कॉल डिटेल्सच्या आधारे या बाबींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांकडून सर्व आरोपींचा गुन्हेगारी इतिहास तपासला जात आहे.

या निर्घृण हत्येची आणि लुटमारीची घटना रविवारी सकाळी शहरभर पसरताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos