जिल्हास्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करणार : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर


- अस्थिव्यंग दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या स्कुटीची पालकमंत्र्यांच्याहस्ते सोडत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : दिव्यांगांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून ५ टक्के निधी दिव्यांगासाठी खर्च झाला पाहिजे ही मोहीम शासनाने हाती घेतली आहे. जिल्ह्यात निधी खर्च करण्याचे योग्य नियोजन सुरू असून जिल्हास्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या सेसफंड योजनेतून अस्थिव्यंग दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या स्कुटीची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते सोडत काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, मुख्य वित्त व लेखाधिकारी मनोज पाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनिषा कुरसुंगे, दिव्यांग कल्याण समितीचे अध्यक्ष संजय जाधव, गिमा टेक्सटाईलचे शकील पठाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग कल्याण हा स्वतंत्र विभाग सुरू केला. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून दिव्यांगांना रोजगार व नोकरीवर जाण्यासाठी ईलेक्ट्रिक स्कुटी दिल्या पाहिजे हा आमचा मानस होता. वर्धा निरामय कार्यक्रमात जिल्ह्यातील ९२ विद्यार्थ्यांना किसान विकास पत्राचे वाटप करण्यात आले. दिव्यांग वर, वधू विवाहाला प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. गोरगरीब, गरजू व्यक्तींना कशी मदत करता येईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण म्हणाले, जिल्हा परिषदेच्या ५ टक्के निधीतून दिव्यांगांना मदत करण्यासाठी इयत्ता ५ वी १० मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थीनींना किसान विकास पत्र देण्यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मान्यता दिली. आज स्कुटी वितरणाच्या लकी ड्रॉ मध्ये स्कुटी न मिळालेल्या उर्वरित लाभार्थ्याना सुध्दा दुसऱ्या टप्प्यात देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समाज कल्याण विभागामार्फत अस्थिव्यंग असणाऱ्या दिव्यांगांना स्कुटी वाटपासाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या नावाची ईश्वर चिठ्ठीव्दारे सोडत करण्यात आली. यावेळी गिमा टेक्सटाईल कंपनीमार्फत सीएसआर फंडातून अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी ७० लॅपटॉप उपलब्ध करुन दिल्याबद्दल गिमाटेक्सचे उपाध्यक्ष शकील पठाण यांचा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Wardha




Petrol Price




