दारूच्या वादातून तरुणाची फिल्मीस्टाइल हत्या


- पैसे व प्रेयसीवरून हल्ला; मित्राचे आई-वडील जखमी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात शहरात घडलेल्या एका थरारक व खळबळजनक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारूच्या नशेत पैसे आणि प्रेयसीवरून झालेल्या वादातून आरोपींनी एका तरुणाच्या घराजवळ जाऊन चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केली.
या हल्ल्यात मृत तरुणाच्या मित्राचे आई-वडीलही गंभीर जखमी झाले आहेत. मनपा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घटनेत रितीक सावनलाल पटले (२२, रा. पार्वतीनगर, कळमना) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ईशा हातीम अन्सारी (५५), मुस्तफा उर्फ गोलू ईशा अन्सारी (२८), लुकमान ईशा अन्सारी (२२), साहिल ईशा अन्सारी (२०), सलाउद्दीन ईशा अन्सारी (१९) तसेच एका अल्पवयीन मुलाला आरोपी करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मुस्तफा अन्सारी, रितीक पटले व त्यांचा मित्र तनसू नागपुरे हे तिघे जुनी मंगळवारी परिसरात ट्रिपलसीट दुचाकीवरून दारू पिण्यासाठी गेले होते. दारू पिऊन परत येत असताना रितीक व मुस्तफा यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाला. याचवेळी रितीकने मुस्तफाला त्याच्या प्रेयसीवरून चिडविल्याने मुस्तफा संतापला. शिवीगाळ व वाद वाढल्यानंतर मुस्तफाने रितीक व तनसूला रस्त्यातच उतरवून दिले.
यानंतर मुस्तफाने झालेल्या वादाची माहिती आपल्या भावाला दिली. त्याच्या भावाने तनसू नागपुरेला फोन करून धमकी दिल्याचे समोर आले आहे. काही वेळातच सर्व आरोपींनी पार्वतीनगर चौकात रितीक व तनसू यांना गाठले आणि चाकू तसेच लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात सलीम अन्सारी हाही जखमी झाला.
हा प्रकार पाहून तनसूचे वडील शिवप्रसाद नागपुरे व आई संगीता नागपुरे मदतीसाठी धावून आले. मात्र आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. आरडाओरड झाल्यानंतर वस्तीतील नागरिक मोठ्या संख्येने गोळा होताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेनंतर सर्व जखमींना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच रितीक पटले याचा मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी तनसू नागपुरे यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात खुनासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी मुस्तफा उर्फ गोलू व रितीक यांच्यात यापूर्वीही वाद झाले होते आणि त्यांच्यात आधीपासूनच मतभेद होते.
या घटनेमुळे नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दारूच्या नशेत वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
News - Nagpur




Petrol Price




