महत्वाच्या बातम्या

 कोपरा शिवारात ट्रॅक्टरसह मुरुम जप्त : घाटंजी येथील वन अधिकारी कार्यालयात वनगुन्हा दाखल


विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घाटंजी वनपरिक्षेत्रातील कोपरा नियतक्षेत्रातील राखीव वन कक्ष क्रमांक ५३१ मध्ये अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात असल्याची बाब वनविभागाच्या रात्रीच्या गस्तीदरम्यान उघडकीस आली. या कारवाईत वनविभागाने ट्रॅक्टर व ट्रॉलीसह मुरुम जप्त करून मुरुम माफियांवर कारवाईचा दणका दिला आहे.

रात्रीच्या गस्तीवेळी ट्रॅक्टर क्रमांक MH-२९ CB-७३३८ व ट्रॉली क्रमांक MH-२९/AT/८१/१९यांच्या सहाय्याने अवैधरीत्या मुरुमाची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येताच घाटंजी वनविभागाच्या पथकाने तात्काळ कारवाई केली. या ठिकाणी अंदाजे २५ ब्रास मुरुमाचे उत्खनन झाल्याचे आढळून आले असून मुरुम जप्त करून व साहित्याची अंदाजे किंमत २१,२५० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालक प्रदीप रामकृष्ण रंदये (रा. मांडवा ता. घाटंजी) तसेच इतर चार व्यक्तींची चौकशी सुरू असून, भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत कलम २६(१) (डी. जी.) व कलम ५२ अन्वये वनगुन्हा क्रमांक ०३,२४/१२/२०२५ रोजी नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही धडक कारवाई पांढरकवडा येथील उपवन संरक्षक यशवंत बहाळे, सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजीचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, क्षेत्र सहाय्यक प्रदीप निवल, वनरक्षक दामोधर नेवारे, परमेश्वर आनकाडे, पंकज भुसारे, प्रकाश मुंडे तसेच वाहन चालक निलेश आगरकर आदींनी सहभाग घेतला.

राखीव वनातील अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात वनविभागाने कडक भूमिका घेतल्याने घाटंजी  परिसरात खळबळ उडाली असून, पुढेही अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशारा, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे (घाटंजी) यांनी दिला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos