ग्रामीण रुग्णालय परिसरातील नागरिकांची गैरसोय संपणार : सार्वजनिक स्वच्छतागृह पुनरुज्जीवित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील प्रभाग क्र. १० मध्ये नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर प्रतिसाद मिळाला असून ग्रामीण रुग्णालयाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृह पुन्हा सुरू करण्याच्या कामाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. नगरसेवक सुमित (गोलू) डोहने व नगरसेविका साजिया शाहिद शेख यांच्या प्रयत्नांतून हा उपक्रम साकार होत असून लवकरच नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या या स्वच्छतागृहामुळे रुग्णालय परिसरात येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. विशेषतः रुग्ण, त्यांचे नातेवाईक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच आठवडी बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छतागृहाच्या अभावामुळे अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर स्वच्छतागृह पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला.
सध्या दुरुस्ती व आवश्यक सुविधांच्या उभारणीची कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच स्वच्छतागृह नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे परिसरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा होण्यासोबतच नागरिकांच्या मूलभूत गरजेची पूर्तता होणार आहे.
प्रभागातील विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नगरसेवक सुमित (गोलू) डोहने यांनी सांगितले. आगामी काळातही नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुरू असलेल्या कामांची पाहणी नगरसेवक सुमित (गोलू) डोहने, नगर सेविका साजिया शेख, नगरसेवक प्रणित सातपुते तसेच शाहिद शेख यांनी करून कामाचा आढावा घेतला. स्वच्छतागृह लवकर सुरू होणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
News - Chandrapur




Petrol Price




