महत्वाच्या बातम्या

 मुंबई : मेट्रो तिकीट बुकिंगची नवी सोय, १४ ॲपद्वारे होईल तिकीट बुकिंग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईकरांसाठी मेट्रो तिकीट बुकिंगची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे. अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ मार्गिकेसाठी तिकीट बुक करण्याची सुविधा विविध १४ ॲप्सवर उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ आणि रांगेत उभे राहण्याची कसरत कमी होईल.

डिजिटल आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना -
महामुंबई मेट्रो संचलन मंडळ (एमएमएमओसीएल) कडून डिजिटल तिकीट बुकिंगची सुविधा ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) नेटवर्कद्वारे लागू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना खासगी कंपन्यांसह विविध ऑनलाइन सेवा पुरवठादार प्लॅटफॉर्मवरूनही मेट्रो तिकीट बुक करता येणार आहे.

प्रवाशांना मिळणार क्यूआर आधारित तिकीट -
प्रवाशांना वन तिकीट, इज माय ट्रीप, कन्फर्म तिकीट, यात्री रेल्वे, व्होडाफोन आयडिया, रेड रेल अशा १४ ॲप्सवर क्यूआर कोड आधारित तिकीट मिळू शकणार आहेत. या पद्धतीमुळे कागदी तिकीटांचा वापर घटेल आणि पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन मिळेल.

रांगेत उभे राहण्याची गरज नाही -
एमएमआरडीए कडून दोन महिन्यांपूर्वी मुंबई वन ॲप लाँच करण्यात आले होते. यामुळे तिकीट बुकिंगचे डिजिटल स्वरूप सुलभ झाले असून, याच्या वापरकर्त्यांची संख्या ३ लाख ७८ हजार ७९२ पर्यंत पोहोचली आहे. कागदी तिकिटांचा वापर कमी झाला असून, रांगेत उभे राहण्याची गरज देखील संपुष्टात आली आहे.

नवीन मेट्रो मार्गिकांमध्येही सुविधा -
सद्यस्थितीत, मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवर दररोज साधारणपणे साडेतीन लाख प्रवासी प्रवास करत आहेत. याशिवाय, दहीसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ आणि मंडाळे ते डी. एन. नगर मेट्रो २ बी मार्गिकांचा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे या मार्गिकांवरील प्रवाशांनाही डिजिटल तिकीट बुकिंगची सुविधा मिळणार आहे.

फायदे -

सोप्या आणि जलद पद्धतीने तिकीट बुकिंग.
रांगेत थांबण्याची आवश्यकता नाही.
कागदी तिकिटांचा वापर कमी होईल.
पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन मिळेल.

यामुळे प्रवाशांना मेट्रोचा वापर अधिक आरामदायक आणि सुविधाजनक होईल, तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने ही एक सकारात्मक पाऊल ठरेल.





  Print






News - Rajy




Related Photos