सर्व ठिकाणची मतमोजणी २१ डिसेंबरला : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय


- न्यायालयाच्या निर्णयामुळे तयारीत बदल
- दोन्ही टप्प्यातील मतदानानंतर सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींची मतमोजणी एकत्र
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सुरुवातीला २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी केली होती. मात्र, न्यायालयीन खटल्यांमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे २४ नगरपरिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी होणारी २ डिसेंबरची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून आता मतदान प्रक्रिया २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, २ डिसेंबर रोजी झालेले मतदान आणि २० डिसेंबर रोजी होणारे मतदान या दोन्ही टप्प्यांतील मतमोजणी २१ डिसेंबर रोजी एकत्र करण्यात येणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. तसेच २० डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत एक्झिट पोल जाहीर केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात निवडणूक आयोगाने आधीपासूनच आवश्यक तयारी सुरू केली होती. मतमोजणी पुढे ढकलण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्यानंतर, सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबरला एकत्र करण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली होती. आज न्यायालयाने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही पद्धत योग्य वाटत नाही, परंतु न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागेल. गेल्या २५-३० वर्षांत मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनुभवतोय, पण यापूर्वी कधीही असे झाले नव्हते की घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या आणि निकालही बदलल्या. यंत्रणेच्या चुकीमुळे होणारा उमेदवारांचा भ्रमनिरास टाळायला हवा, असे त्यांनी नमूद केले.
या निर्णयामुळे निवडणूक आयोग, उमेदवार, तसेच प्रशासनाची जबाबदारी आणि तयारी आणखी मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वांचेच लक्ष आता २१ डिसेंबरच्या मतमोजणीकडे लागले आहे.
News - Nagpur




Petrol Price




