सर्पदंशाने मृत झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या डॉक्टरांना सोडण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा गोरेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा


- १४ ऑक्टोबर रोजी साप चावल्याने झाला होता बालकाचा मृत्यू 
- बालाघाट येथील डॉक्टरांनी आज १६ ऑक्टोबरपर्यंत बालकाला जिवंत करण्याचा केला होता दावा 
- गोरेगाव पोलिसांनी डॉक्टरांना घेतले ताब्यात 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
सर्पदंशाने मृत्यू झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या बालाघाट येथील दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना गोरेगाव पोलिसांनी सोमवारी काल १५ ऑक्टोबर रोजी  रात्री ताब्यात घेतले. यामुळे घोटी येथील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला. पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टरांना त्वरीत सोडण्यात यावे. या मागणीला घेवून नागरिकांनी आज  १६ ऑक्टोबर रोजी  सकाळी १० वाजता गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. गोंदिया-कोहमारा मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. टायरची जाळपोळ केली. त्यामुळे गोरेगाव येथे तणावपूर्ण वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील आदित्य गौतम या आठ वर्षीय बालकाचा सर्प दंशाने रविवार १४ ऑक्टोबर रोजी   मृत्यू झाला. बाई गंगाबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषीत केले. दरम्यान बालघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्हारे यांनी सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला २४ तासात जिवंत करण्याचा दावा केला. यासाठी बालाघाटावरुन ते आपल्या दोन तीन सहकाऱ्यांसोबत गोरेगाव येथे सोमवारी रात्री उशीरा पोहचले. मात्र एकदा मृत्यू झालेला व्यक्ती परत जिवंत होत नसून हा अंधश्रध्दा निर्माण करणारा प्रकार आहे. त्यामुळे गोरेगाव पोलिसांनी डॉ.लिल्हारे व दोन जणांना सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यामुळे त्यांना घोटी येथे पोहचता आले नाही. पोलिसांनी डॉ.लिल्हारे यांना घोटी येथे पोहचू दिले नाही, त्यामुळे बालकाचे प्राण वाचविता आले नाही असा आरोप करीत घोटी येथील नागरिकांनी मंगळवारी (दि.१६) गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच गोंदिया-कोहमारा मार्गावर टायरची जाळपोळ करुन रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे गोरेगाव येथे तनावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखत अतिरिक्त पोलीस ताफा मागविण्यात आला आहे.
आदित्य सुमेश गौतम (८) रा. घोटी असे मृत घोषित करण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे. रविवारी सकाळी ११.३० वाजता त्याला सर्पदंश झाल्याने तासाभरानंतर त्याच्यावर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गोंदिया येथील बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. १४ आॅक्टोबरला दुपारी १.३० वाजता बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्पण चव्हाण यांनी त्याला मृत घोषित केले. आदित्य शिशू मंदिर येथील दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता. सर्पदंशाची घटना वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच म्हसगाव येथील एका इसमाने सर्पदंश झालेल्या इसमावर बालाघाट येथील डॉ. नवीन लिल्हारे (साईधाम) हे उपचार करतात अशी माहिती दिली. यावर गौतम कुटुंबीय व नातेवाईकांनी डॉ. लिल्हारे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून घडलेली घटना सांगितली. डॉ. नवीन लिल्हारे यांनी आदित्य गौतम यांच्या हाताची नस कापा असे सांगितले. हाताची नस कापली असता रक्त बाहेर आले हे सांगताच डॉ. नवीन लिल्हारे यांनी आदित्य जिवंत असल्याचे सांगत २४ तासात जिवंत करण्याचा दावा केला. त्यामुळे आदित्यला स्मशानभूमीतून घरी परत आणण्यात आले. आदित्यचे वडील सहा वर्षांपूर्वीच मृत्यू पावले आहे. आई शीला गौतम मजुरीचे काम करते.    Print


News - Gondia | Posted : 2018-10-16


Related Photos