रेल्वे स्टेशनवर आढळलेले तेलंगणातील बालक पालकांच्या ताब्यात


- बाल संरक्षण कक्षाच्या परिश्रमातून बालक पालकांकडे सुखरुप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : काही महिन्यांपर्वी अंदाजे आठ वर्षांचे एक बालक वर्धा रेल्वे स्टेशनवर एका गाडीमध्ये विनापालक आढळून आले होते. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अथक परिश्रमाने या बालकाचा ताबा त्याच्या तेलंगना येथील पालकास देण्यात आला आहे.
तेलंगना राज्यातील बन्नी नावाचे अंदाजे आठ वर्ष वयाचे बालक २८ मे रोजी रोजी वर्धा रेल्वे स्टेशनवर एका गाडीमध्ये विनापालक आढळून आले होते. चाईल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून बालकास बाल कल्याण समिती यांना सादर करुन शासकीय मुलांचे निरिक्षणगृह, बालगृहात दाखल करण्यात आले. बालकाशी संवादादरम्यान ते तेलगु भाषेत बोलत असल्याचे लक्षात आले. पाच वेगवेगळ्या द्विभाषिकांना बोलावून बालकाशी संवाद साधून त्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू बालकाकडून कोणतीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती.
बालकाच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, संस्था यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. याबाबत बालकाचे आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया, वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली. बालकासोबत चर्चा करतांना त्याने निर्मल या शब्द उच्चारला व तेथून शोध घेण्याचा दुसरा टप्पा सुरु झाला. जिल्हा निर्मल, राज्य तेलंगणा येथील बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांना संपर्क साधून बालकासंदर्भातील माहिती देण्यात आली. बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत निर्मल येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना सामाजिक तपासणी अहवाल मागविण्यात आला.
बालक तेलगू भाषा बोलत असल्याने तेलंगणा राज्यातील बाल कल्याण समिती, निर्मल यांना माहिती देण्यात आली. बाल कल्याण समिती वर्धा व निर्मल यांच्या समन्वयातून बालकाला १९ नोव्हेंबर रोजी निर्मल या ठिकाणी स्थलांतरण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालकास स्वगावी पोहोचविण्याठी टिम रवाना करण्यात आली होती. बालक तेलंगणा राज्यतील कामारेड्डी येथील असल्याची माहिती मिळाली.
कामारेड्डी बाल कल्याण समितीच्या समक्ष बालकास सादर करण्यात आले. समितीमार्फत हरविलेल्या बालकास वडीलाच्या ताब्यात देण्यात आले. सदर कार्यवाही बाल कल्याण समिती वर्धा, निर्मल व कामारेड्डी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बालगृह, पोलिस विभाग, चाईल्ड हेल्पलाईन यांच्या मार्फतीने यशस्वी करण्यात आली. संपुर्ण कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे, बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी, संरक्षण अधिकारी वैशाली मिस्कीन, संस्थेतील अधिक्षिका सुजाता देशमुख व समुपदेशक अमोल राठोड, चाईल्ड हेल्पलाईन मधील सुरज वानखेडे, पोलिस विभागातील प्रविन मुन व बालगृहातील कर्मचारी यश गायकवाड इत्यादी केली आहे. हरविलेल्या बालकाची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Wardha




Petrol Price




