महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला रोटरी उत्सवात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद


- चार दिवसात तब्बल १२४२ मतदारांनी घेतला लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : स्वावलंबी शाळेच्या मैदानात रोटरी क्लबद्वारे आयोजित उत्सवात जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार जनजागृतीसाठी दालन लावण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते उद्घाटन झालेल्या या दालनाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल 1 हजार 242 मतदारांनी लाभ घेतला.

जिल्ह्यात मतदार जनजागृतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असलेले कार्यक्रम, उपक्रमांच्या ठिकाणी मतदार जनजागृती दालन लावण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. त्यामुळे ठिकठिकाणी अशी दालने निवडणूक विभागाच्यावतीने लावली जात आहे. त्याअनुषंगाने रोटरी उत्सवात विशेष दालन लावून मतदार नोंदणी व जनजागृती अभियान राबविण्यात आले होते.

दालनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. चार दिवस चाललेल्या या उत्सवात तब्बल 1 हजार 242 मतदारांनी मतदार नोंदणीसह विविध अर्ज दाखल करुन दालनाचा लाभ घेतला. त्यात 365 नवीन मतदारांची नोंदणी झाली, 42 मतदार वगळण्यात आले, 330 मतदानकार्डची दुरुस्ती करण्यात आली, 120 मतदार ओळखपत्रास आधार जोडणी करण्यात आली, 385 मतदारांनी व्होटर हेल्प ॲप डॉऊनलोड करुन घेतले तसेच 1 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी मतदान नोंदणी विषयी माहिती जाणून घेतली.

स्टॉलच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, तहसिलदार रमेश कोळपे, नायब तहसिलदार भगवान वनकर उपस्थित होते. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मंगेश गिरडे, पर्यवेक्षक एस.जी.बाभळे, संतोष साटोटे, बी.बी. सैस्वार, उदय साळवे, ए.व्ही. पोहाणे, राजेंद्र सावरकर, दिनेश सातकर, व्ही.एस.चिव्हाणे, पल्लवी टिकस, अर्चना गांजरे यांनी मतदार नोंदणी व जनजागृतीचे काम केले.  नवमतदारांनी अर्ज कसा भरावा तसेच नावात, पत्त्यात बदल, नाव वगळण्याची प्रक्रिया तसेच आधार जोडणीबाबत माहिती दिली.






  Print






News - Wardha




Related Photos