महत्वाच्या बातम्या

 महापालिकांची प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी १२ डिसेंबरला : सुधारित आदेशानुसार जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात महत्त्वाचा बदल केला आहे. २८ नोव्हेंबरला जाहीर होणार असलेली प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी आता १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित केली जाणार आहे.

महापालिका प्रशासन प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबर ऐवजी १४ नोव्हेंबर रोजी प्रकाशित करणार आहे. यावर १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान हरकती व सूचना मागवून ६ डिसेंबर रोजी अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी जाहीर केली जाईल आणि १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय सुधारित मतदार यादी जाहीर केली जाईल.

राज ठाकरेंचा हल्लाबोल -
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आयोगावर तीव्र टीका केली आहे. आयोग सत्ताधाऱ्यांच्या बाहुल्यांसारखा काम करत आहे. दुबार मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील गडबडीवर एकही उत्तर देण्यास आयोग तयार नाही, असे ठाकरेंनी म्हटले.

विविध पक्षांचा विरोध -
उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि राज्य मंत्री आ. अनिल परब यांनी आयोगाच्या कार्यशैलीवर आरोप करत म्हटले की, आयोग भाजपच्या अजेंड्याप्रमाणे काम करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील आयोगावर टीका केली. निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्याची जबाबदारी आयोगाची आहे. परंतु आयोग त्यापासून पळ काढत आहे, असे ते म्हणाले.

दुरुस्त न केलेल्या मतदार याद्या आणि दुबार नोंदणीच्या मुद्द्यांवर चर्चेला सुरवात होईल, असे दिसते, आणि आगामी निवडणुकीत वातावरण अधिकच तणावपूर्ण होईल, अशी चिन्हे आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos