हल्ल्यानंतर पाच महिन्यांनी मोठी कारवाई : मोहम्मद युसूफ कटारीला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिल महिन्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणारा कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी मोहम्मद युसूफ कटारी (२६) याला सुरक्षा दलांनी अटक केली आहे. त्याच्यावर दहशतवाद्यांना रसद व साहित्य पुरविल्याचा गंभीर आरोप आहे. या मदतीमुळेच बारसन व्हॅली येथे २६ निष्पाप पर्यटकांचा निर्घृण खून झाला होता.
कटारीला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
चौकशीत धक्कादायक कबुलीजबाब -
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान युसूफ कटारीने कबूल केले की तो हल्ल्यातील दहशतवाद्यांना चार वेळा भेटला होता आणि त्यांना मोबाईल चार्जर पुरवला होता. ही मदतच त्याच्या अटकेस कारणीभूत ठरली.पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी कटारीला अटक केली. तपासात उघड झाले की कटारीने द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांना लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता.
ऑपरेशन महादेवमधून उकलले सूत्र -
सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव दरम्यान जप्त केलेल्या वस्तूंच्या तपासातून कटारीपर्यंत पोहोचले.
जूनच्या सुरुवातीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून हल्ल्यामागे लष्कर कमांडर सुलेमान शाह, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी असल्याचे उघड झाले.
यानंतर २८ जुलै रोजी झालेल्या ऑपरेशन महादेव’मध्ये हे तीनही दहशतवादी ठार करण्यात आले. मात्र, तपास सुरूच राहिला आणि त्या दरम्यान सापडलेल्या अर्धवट नष्ट झालेल्या मोबाईल चार्जरमुळे कटारीवर संशय आला. चार्जरचा तपास घेतल्यानंतर पोलिसांनी त्याचा मूळ मालक शोधून काढला. या सूत्रावरूनच तपासणी पुढे सरकली आणि अखेर ती युसूफ कटारीपर्यंत पोहोचली. कटारी हा उंच पर्वतीय भागात राहून भटक्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत असे.
एनआयएचा पुढील तपास आणि इतर अटक -
पहलगाम हल्ल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच २३ जून रोजी, एनआयएने पहलगाम परिसरातून आणखी दोन जणांना अटक केली होती. तपासात उघड झाले की या दोघांनी हल्लेखोर तिन्ही दहशतवाद्यांना हिल पार्कमधील तात्पुरत्या झोपडीत आश्रय दिला होता आणि त्यांना जेवणासह इतर आवश्यक सुविधा पुरवल्या होत्या.
त्यामुळे हल्ल्याच्या नियोजनात स्थानिक पातळीवरून मिळालेली मदत हा प्रमुख घटक असल्याचे स्पष्ट झाले.
पहलगाम हल्ल्याचा पार्श्वभूमी -
हा भयंकर हल्ला २२ एप्रिल २०२५ रोजी झाला होता. पहलगामपासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बारसन (बायसरन) खोऱ्यात तिन्ही दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर १६ जण गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारे लक्ष्य केले होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
सुरक्षा दलांचे पुढील पाऊल -
सध्या युसूफ कटारीच्या चौकशीतून अनेक महत्वाची माहिती समोर येत आहे. पोलिस आणि एनआयए या दोन्ही यंत्रणा मिळून या हल्ल्याच्या संपूर्ण कटकारस्थानाचा उलगडा करण्यासाठी तपास पुढे नेत आहेत. सुरक्षा दलांनी स्पष्ट केले आहे की पहलगाम हल्ल्यात सहभागी किंवा मदत करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही.
News - World




Petrol Price




