महत्वाच्या बातम्या

 मुसळधार पावसाने बंगाल ठप्प : दार्जिलिंगमध्ये भूस्खलनात सहा ठार, महामार्ग बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दार्जिलिंग जिल्ह्यातील मिरिक येथे झालेल्या भूस्खलनात किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण बेपत्ता असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिरिक आणि कुर्सियांगला जोडणारा दुदिया आयर्न ब्रिज कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.  सिलीगुडी-दार्जिलिंग राज्य महामार्ग-१२ तसेच राष्ट्रीय महामार्ग ११० वरील हुसैन खोला येथे भूस्खलन झाल्याने दोन्ही मार्गांवरील संपर्क पूर्णतः तुटला आहे. मलब्यामुळे अनेक रस्ते बंद पडले असून, प्रशासनाने आपत्कालीन सेवांसाठी पर्यायी मार्गांचा वापर सुरू केला आहे.

सततच्या पावसामुळे बचावकार्य अडथळ्यांत आले आहे. निसरड्या रस्त्यांमुळे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन पथकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना डोंगराळ भाग, नदीकाठ आणि नालेकाठांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राजगंजमधील पोराझार येथे महानंदा नदीवरील बंधारा तुटल्याने अनेक घरे आणि शेती पाण्याखाली गेली आहेत. या भागातील रहिवाशांना स्थलांतरित करून तात्पुरत्या निवारा शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे.

हवामान विभागाचा रेड अलर्ट -
भारतीय हवामान विभागाने (IMD) दार्जिलिंग, कलिम्पॉंग, कूचबिहार, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सोमवारपर्यंत राज्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तीस्ता आणि माल नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, मालबाजार आणि डुआर्स परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पर्यटन स्थळांचे मोठे नुकसान -
मिरिक आणि कुर्सियांगसह दार्जिलिंग जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळांना मोठा फटका बसला आहे. अनेक घरे मलब्याखाली गाडली गेली असून, रस्त्यांवर चिखल आणि दगडांचा खच पडला आहे. प्रशासनाने अनेक गावे रिकामी करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

शुभेंदु अधिकारी यांची केंद्राकडे मागणी -
पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी एक्सवर म्हटले आहे की, दार्जिलिंग, कालिम्पॉंग आणि कुर्सियांगमधील डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला असून भूस्खलन आणि पुरामुळे सिलीगुडी, तराई आणि डुआर्समधील संपर्क तुटला आहे. केंद्र सरकारने तातडीने मदत पथके पाठवून रस्त्यांची पुनर्बांधणी आणि आवश्यक पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेजारील राज्यांनाही इशारा -
दरम्यान, झारखंडच्या पश्चिम भागात, दक्षिण बिहार आणि दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेशातही पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुर्शिदाबाद, बीरभूम आणि नदिया जिल्ह्यांमध्ये सोमवारपर्यंत पावसाची शक्यता असून, बांकुरा येथे गेल्या २४ तासांत ६५.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, खालच्या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.





  Print






News - World




Related Photos