महत्वाच्या बातम्या

 केवळ अनैतिक संबंध पुरेसे नाहीत आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी : उच्च न्यायालय


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : आत्महत्या केलेल्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते म्हणून संबंधित पुरुषाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यांतर्गत कारवाई करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्तिद्वय उर्मिला जोशी-फलके व नंदेश देशपांडे यांनी हा निर्णय एका प्रकरणात सुनावला.

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलिस ठाण्यात कार्यरत वाहन चालक प्रवीण बोरकर यांचे सहकारी महिला पोलिस कॉन्स्टेबलसोबत कथित अनैतिक संबंध होते.

याच कारणावरून संबंधित महिला कॉन्स्टेबलने ९ डिसेंबर २०२१ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप करण्यात आला होता. त्यावरून बोरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने मंजूर केली.

न्यायालयाने स्पष्ट केले की, मृत महिलेबरोबर आरोपीचे अनैतिक संबंध होते, याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच, संबंध होते हे मान्य केले तरी आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी आरोपीकडून कोणतीही थेट किंवा अप्रत्यक्ष कृती झाल्याचे सिद्ध झालेले नाही. मृताने आत्महत्या करावी, हा आरोपीचा उद्देश होता किंवा तिच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता, याचे कोणतेही पुरावे रेकॉर्डवर नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

दरम्यान, घटनेच्या वेळी आरोपीनेच मृत महिलेचा फास काढून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, अशी माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. समीर सोनवने यांनी न्यायालयाला दिली. अनैतिक संबंध व आत्महत्या यांचा काहीही संबंध नसून संबंधाबाबतही केवळ संशय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.





  Print






News - Nagpur




Related Photos