रविवारी नवभारत साक्षरता परीक्षा : निरक्षरांना साक्षर होण्याची संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात रविवार २१ सप्टेंबर रोजी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या निरक्षर व्यक्तींनी आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
या परीक्षेचा मुख्य उद्देश १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या निरक्षर व्यक्तींना मूलभूत साक्षरता कौशल्ये प्रदान करणे हा आहे. यात वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्ये तपासली जातील. केंद्र शासनाच्या उल्लास या कार्यक्रमांतर्गत ही परीक्षा घेण्यात येत आहे, ज्यामध्ये निरक्षर व्यक्तींना केवळ साक्षर बनवणेच नाही तर त्यांना जीवनोपयोगी कौशल्ये, जसे की आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता आणि आरोग्यविषयक माहिती देणे हे देखील समाविष्ट आहे.
परीक्षेसाठी उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच ओळखपत्र म्हणून मूळ आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा बँक पासबुक यापैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्र हे त्याच शाळेत असेल जिथे उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार असून दिव्यांगांसाठी ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. ही परीक्षा मराठी या माध्यमामध्ये देता येईल.
उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळा किंवा निळा शाईचा पेन वापरावा. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र दिले जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




