महत्वाच्या बातम्या

 यमुनेच्या पुराने दिल्ली जलमय : मंत्रालयापर्यंत पाणी, हजारो नागरिक विस्थापित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये यमुना नदीच्या पुराने थैमान घातले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढून २०७.४८ मीटरवर पोहोचली आहे. धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर ६३ वर्षांत चौथ्यांदा इतका मोठा महापूर आला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी यमुनेचे पाणी थेट दिल्ली मंत्रालयापर्यंत पोहोचले. राजघाट, कश्मिरी गेट, रिंग रोड परिसरासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, नदीकाठच्याच नव्हे तर शहरातील इतर भागांतील घरेही बुडाली आहेत. स्वामी नारायण मंदिर, फुटओव्हर ब्रिज, सिव्हिल लाईन भागातील बंगले तर मयूर विहार फेज-१ मधील निवारा शिबिरेही पुराच्या पाण्यात सापडली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील अलीपूरजवळील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला असून, त्यात एक रिक्षा अडकली. चालक किरकोळ जखमी झाला आहे. मंत्रालयाजवळील भुयारी मार्गात पाणी भरल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.नदीपात्रातील पाणी आता शहरात शिरून अनेक ठिकाणचे नाले उपसले आहेत. त्यामुळे रस्त्यावर घाणेरडे पाणी वाहू लागले असून, कार्यालयांबाहेर पाणी साचले आहे. राजघाट मार्ग पोलिसांनी बंद केला आहे.

सध्या नदीची पातळी स्थिर असली तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होईल, अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दिल्लीतील सखल भागांमध्ये जलप्रलयाचे सावट गडद होत आहे.





  Print






News - World




Related Photos