महत्वाच्या बातम्या

 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत डेंग्यू, गॅस्ट्रो साथीचे संकट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांच्या उत्साहावर साथीच्या आजारांनी पाणी फेरले आहे. पावसाळ्यातील अस्वच्छता, दूषित अन्नपाणी आणि बदलते हवामान यामुळे डेंग्यू, गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हरसारख्या आजारांनी जोर धरला आहे.

गेल्या आठवड्याभरात शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये ताप, अंगदुखी, श्वसनतक्रारी घेऊन दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषतः बालक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक बाधित होत असल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनी कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कशामुळे वाढली साथ -
अस्वच्छता आणि साचलेले पाणी, डास व किटकांचा प्रादुर्भाव, उघड्यावरचे अन्न आणि दूषित पाणी, हवामानातील सतत बदल

कोणते आजार आणि लक्षणे -
डेंग्यू : ताप, अंगदुखी, लाल चट्टे, डोळ्यांमागे वेदना, गॅस्ट्रो / अतिसार : उलटी, वारंवार शौच, अशक्तपणा, स्वाइन फ्ल्यू : खोकला, ताप, श्वसनास त्रास, कोविड / व्हायरल फिव्हर : ताप, सर्दी, अंगदुखी, हेपॅटायटिस (ए/इ) : पिवळ्या डोळ्यांबरोबर उलटी, थकवा

रुग्णसंख्या (जानेवारी ते १४ ऑगस्टपर्यंत) -
मलेरिया : ४ हजार ८२५, डेंग्यू : १ हजार ५६४, गॅस्ट्रो : ५ हजार ५१०, कोविड-१९ : १ हजार १०९, हेपॅटायटिस (ए/इ) : ७०३, लेप्टोस्पायरोसिस : ३१६, चिकनगुनिया : ३२८

सावध राहा, सुरक्षित रहा -
उकळलेले किंवा फिल्टर पाणी प्या, बाहेरचे अन्न व पाणी टाळा, घराभोवती पाणी साचू देऊ नका, गणेशमंडपात गर्दी टाळा, मास्क वापरा, वारंवार हात धुवा, आजारी व्यक्तीपासून अंतर ठेवा, गणेशोत्सव साजरा करताना आरोग्याची काळजी घ्या. छोटीशी बेफिकीरी मोठ्या संकटाचे कारण ठरू शकते.





  Print






News - World




Related Photos