शाळेतील शौचालयात पाचवीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह : शिक्षक-शिक्षिकेवर पालकांचा गंभीर आरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पटना : चितकोहरा कन्या मध्य विद्यालयात बुधवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास शाळेच्या शौचालयात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी थेट शाळेतील शिक्षक व शिक्षिकेवर गंभीर आरोप लावले असून, मुलीच्या हत्येत त्यांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे.
मृत विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील होती. तिचे वडील भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात, तर आई घरकाम करते. विद्यार्थिनीच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या बहिणीने शाळेतील एका शिक्षक व शिक्षिकेला नको त्या अवस्थेत पाहिले होते.
त्यानंतर संबंधित शिक्षिकेने या गोष्टीबाबत कुणालाही सांगू नये, अशी धमकी दिली होती. मात्र विद्यार्थिनीने हे प्रकरण मुख्याध्यापकांना सांगण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यामुळेच तिला जिवंत जाळण्यात आले, असा गंभीर आरोप मुलीच्या वडिलांनी केला असून, दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शाळेत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ते सर्वच निकामी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सचिवालय डीएसपी-१ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी शौचालयाचा दरवाजा आतून बंद होता, असे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी शिक्षकांसह शाळेशी संबंधित काही जणांची चौकशी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
News - World




Petrol Price




