महत्वाच्या बातम्या

 दोड्यात ढगफुटीचा कहर : दहा घरे वाहून, चौघांचा बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / दोडा (जम्मू-काश्मीर) : उत्तराखंडातील धराली आणि किश्तवाडप्रमाणेच जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील थाथरी उपविभागात सोमवारी पहाटे ढगफुटी झाली. अचानक आलेल्या महापूरामुळे दहा हून अधिक घरे वाहून गेली असून, आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

डोंगरावरून आलेल्या पुराचा तडाखा -
ढगफुटीनंतर परिसरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. दोड्यातील शेकडो झाडांसह मार्गात येणारी घरे पाण्यात वाहून गेली. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हवामान खात्याने संध्याकाळपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने बचाव कार्यात अडथळा येण्याची भीती व्यक्त होत आहे.

नदीचे पाणी शहरात शिरले -
समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह शहरात शिरल्याचे स्पष्ट दिसते. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमुळे बाजारपेठाही पाण्याखाली गेल्या आहेत. अपघात टाळण्यासाठी अनेक रस्ते बंद करण्यात आले असून, बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. दरम्यान, रामबन परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनामुळे जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.

धराली व किश्तवाडमध्येही विध्वंस -
यापूर्वी उत्तराखंडमधील धराली गावात झालेल्या ढगफुटीत पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक बेपत्ता झाले होते. त्याचप्रमाणे १४ ऑगस्ट रोजी किश्तवाडच्या चाशोटी गावात ढगफुटी होऊन प्रचंड जीवित व वित्तहानी झाली होती. दोड्यातील सध्याची स्थिती या घटनांचीच भीषण पुनरावृत्ती ठरत आहे.





  Print






News - World




Related Photos