महत्वाच्या बातम्या

 मुदतबाह्य जलजीऱ्यामुळे सात विद्यार्थिनींना विषबाधा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सात विद्यार्थिनींना मुदतबाह्य जलजीऱ्याचे सेवन केल्याने विषबाधा झाली. गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून, संबंधित सर्व विद्यार्थिनींवर गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असून धोक्याबाहेर आहे.

विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींची नावे अशी : अर्चू नागेश कटरे, अंशिका जितेंद्र कडाम, निधी दीपक नागफासे, प्राची केशवराव येळे, स्वाती रोशन मेश्राम, चेतना नंदकुमार सांडीले व त्रिशा होमेंद्र चव्हाण. ही सर्व विद्यार्थीनी पाचवीत शिकत असून, दुपारच्या सुटीनंतर शाळेजवळील एका किराणा दुकानातून जलजीऱ्याचे पाकिट विकत घेऊन त्यांनी वर्गातच त्याचे सेवन केले. काही वेळातच सातही मुलींना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला.

घटनेची माहिती मिळताच शाळेच्या मुख्याध्यापिका अंजना हरिणखेडे यांनी तत्काळ विद्यार्थिनींना कुऱ्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

गावकऱ्यांचा संताप, दुकानदारावर कारवाईची मागणी -
घटनेची माहिती पालक व गावकऱ्यांना मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली. मुदतबाह्य खाद्यपदार्थ विकणाऱ्या संबंधित दुकानदारावर कठोर कारवाई करावी, त्याचा परवाना रद्द करून दुकान बंद करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. त्यामुळे गावात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

गोरेगाव पोलिसांचा तपास सुरू -
घटनेची गंभीर दखल घेत गोरेगाव पोलिसांनी दुकानदारांविरोधात चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

मुख्याध्यापिकांचे वक्तव्य -
विद्यार्थिनींना अचानक पोटात दुखू लागल्यावर आम्ही वेळ न दवडता त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. सध्या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, असे मुख्याध्यापिका अंजना हरिणखेडे यांनी सांगितले.





  Print






News - Gondia




Related Photos