मोहफुलाचा सडवा केला नष्ट : असरअल्ली पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : असरअली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोत्तापल्ली गावात पोलिसांनी धाड टाकली व मोहाच्या फुलांचा सडवा नष्ट केला.
गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारू बंदी असूनही जिल्ह्यातल्या अनेक भागात आजही वेगवेगळ्या प्रकारची दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते. त्यातही मोहाची दारू काढण्याचे प्रमाण अधिक आहे. गावांमध्ये अनेक दारू विक्रेते मोठ मोठ्या ड्रममध्ये मोहाची फुले सडवत ठेवतात व नंतर त्याची दारू काढून दारूची विक्री करतात. गावांमध्ये अशा रीतीने अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस गुप्त माहितीच्या आधारे सडवत ठेवलेल्या मोहाची माहिती मिळवून त्यावर कारवाई करतात.
अशाच प्रकारे असरअली पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर दराडे व त्यांच्या टीमला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी कोत्तापल्ली गावात अचानक धाड टाकली. गावातील दारू काढण्यासाठी लपवण्यात आलेला मोहाचा सडवा शोधून तो नष्ट केला व सापडलेल्या साहित्याची होळी केली. जवळपास एक ते दीड लाखाचा सडवा या कारवाईत नष्ट करण्यात आला.
News - Gadchiroli | Posted : 2018-10-11