पावसाचे पुनरागमन : कुठे रिमझिम, कुठे जोरदार धारा


- आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस बरसला; धान उत्पादकांना दिलासा, मात्र फुलोऱ्यातील पिकांना वाऱ्यासह पावसाचा धोका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा जिल्ह्यात हजेरी लावली. दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाही जिल्ह्यात सर्वदूर समान पाऊस झाला नाही. काही भागांत रिमझिम पाऊस झाला, तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, शेतीसाठी समाधानकारक आणि दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
भंडारा शहरात दुपारी २ वाजताच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे शहरातील जनजीवनावर काहीसा परिणाम झाला. विशेषतः फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना पावसाचा फटका बसला. तालुक्यात मात्र जोरदार पावसाची नोंद झाली नाही.
पालांदूर परिसरात तासभर जोरदार सरी -
लाखनी तालुक्यात दुपारनंतर तुलनेने चांगला पाऊस झाला. पालांदूर परिसरात जवळपास तासभर जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. किटाडीसह परिसरातील गावांमध्ये दुपारी ३.४५ वाजतानंतर पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर जोरदार सरी बरसल्याने शेतशिवारात चांगला ओलावा निर्माण झाला.
धान पिकांसह तीळ आणि तूर पिकांनाही सध्या पावसाची गरज होती. त्यामुळे या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लाखांदूर, तुमसर आणि साकोली तालुक्यांतही पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
पवनीत दहा दिवसांनंतर पावसाची हजेरी -
पवनी तालुक्यातही सुमारे दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे कोरडे पडत चाललेल्या शेतजमिनीला ओलावा मिळाला असून, धान पिकाला काही प्रमाणात जीवनदान मिळाले आहे. आगामी दोन-तीन दिवसांत पाऊस कायम राहिल्यास पिकांना त्याचा अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.
सरासरीच्या तुलनेत १८ टक्के पाऊस कमी -
चालू मान्सून हंगामात भंडारा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अद्याप सुमारे १८ टक्के पाऊस कमी आहे. त्यामुळे पावसातील खंडाचा परिणाम शेतीवर जाणवत आहे. विशेषतः धान उत्पादक शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे काही भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस होणे आवश्यक आहे.
फुलोऱ्यावरील धान पिकांसाठी धोक्याची घंटा -
एकीकडे पावसाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे फुलोऱ्यावर आलेल्या धान पिकांसाठी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. स्वतंत्र सिंचन क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धानाची रोवणी पूर्ण केली होती. ही पिके आता फुलोऱ्याच्या आणि दाणा भरण्याच्या अवस्थेत आहेत.
यंदा वेळेवर पाऊस झाल्याने परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी हलक्या कालावधीच्या धान वाणांची लागवड केली होती. सध्या ही पिके अत्यंत नाजूक अवस्थेत आहेत. अशा वेळी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा झाल्यास फुलोऱ्यावर असलेले धान पीक जमिनीवर आडवे पडण्याची शक्यता आहे.
जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे फुलोऱ्यातील धानाचे पीक लोळण्याची शक्यता वाढते. तसेच सततच्या पावसामुळे फुलोऱ्यातील परागकण धुऊन गेल्यास फलधारणेवर परिणाम होऊ शकतो.परिणामी धानाच्या कणसात दाणे कमी भरण्याची आणि फोलपट राहण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. ज्या बांध्यांमध्ये धान दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे, तेथे पाणी साचल्यास ओंबी कुजण्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.
पावसाने धानाला जीवनदान, पण व्यावसायिकांची चिंता वाढली -
पावसाच्या पुनरागमनामुळे धान पिकाला काही प्रमाणात जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. मात्र, पाऊस सर्वदूर आणि आवश्यक प्रमाणात झालेला नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील दोन-तीन दिवसांच्या पावसाकडे लागले आहे.
दरम्यान, ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या पावसाचा परिणाम शेतीकामांसोबतच दैनंदिन उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारांवरही झाला. फुटपाथवरील विक्रेते, हातगाडीधारक आणि अन्य छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर पावसाचा परिणाम जाणवला. पावसामुळे शहरातील वाहतूकही काही प्रमाणात मंदावलेली दिसून आली.पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी आता दमदार आणि सलग पावसाची प्रतीक्षा कायम आहे.




Petrol Price




