महत्वाच्या बातम्या

 वरोरा शहरातील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी सिग्नल यंत्रणेची गरज होती : नगराध्यक्ष अर्चना ठाकरे


- माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; आनंदवन चौक व रत्नमाला चौकात वाहतूक सिग्नल सुरू झाल्याबद्दल वरोरावासीयांच्या वतीने सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : नागपूर–चंद्रपूर महामार्गावरील महत्त्वाचे शहर असलेल्या वरोरा येथे दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची वर्दळ, अवजड वाहतूक आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेता शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारणे ही काळाची गरज होती. यासाठी माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहेत, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी केले.

नागपूर महामार्गावरील आनंदवन चौक आणि रत्नमाला चौक येथे वाहतूक सिग्नल बसविण्यात आल्याबद्दल वरोरावासीयांच्या वतीने माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांचा रत्नमाला चौकात विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष योगिता नेरकर, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख नितीन मते, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. निशी सैनानी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विधानसभा प्रमुख विलास नेरकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा संघटक मनीष जेठानी, काँग्रेस नेते प्रवीण काकडे, नगरपालिकेचे गटनेते गजानन मेश्राम, सभापती गजानन जिवतोडे, राहुल देवडे, जागृती फाऊंडेशनचे प्रवीण धनवलकर, काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत खापणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चिकटे, शहराध्यक्ष निलेश भालेराव, शिवसेनेचे राजू महाजन, सामाजिक कार्यकर्ते आशिष ठाकरे, शकील पटेल, जयंत ठमके, नगरसेवक बंडू देऊळकर, अभय ठावरी, फिरोज पठाण, अतुल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी विलास टिपले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. नागपूर–चंद्रपूर महामार्गावरून मोठ्या प्रमाणात लहान-मोठी वाहने तसेच अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा असणे आवश्यक होते. या सुविधेमुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल तसेच अपघातांचा धोका कमी करण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी २०२२ पासून केलेल्या पाठपुराव्याचा आढावा मांडला. शहरातील वाढती वाहतूक, नागरिकांची सुरक्षितता आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने संबंधित यंत्रणांकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अखेर आनंदवन चौक आणि रत्नमाला चौक येथे वाहतूक सिग्नलची व्यवस्था कार्यान्वित झाल्याने या प्रयत्नांना यश मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात उपस्थित विविध मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त करून शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नांचे स्वागत केले. कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वरोरा शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सिग्नलची सुविधा उपलब्ध झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांना दिलासा मिळणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.





  Print






Related Photos