नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची १४.७० लाखांनी फसवणूक


- लिपिकपदावर नियुक्तीचे आश्वासन; बनावट नियुक्तीपत्र, सेवापुस्तक आणि डीडी दिल्याचा आरोप, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : वनविभागात लिपिकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची १४ लाख ७० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली संबंधित तरुणाकडून पैसे घेण्यात आले. त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट ई-मेलद्वारे नियुक्तीपत्र, सेवापुस्तक आणि डिमांड ड्राफ्ट (डीडी) दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १२ नोव्हेंबर २०२५ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. रोहित दिनेश भिवाडे (३२ वर्ष), मूळ रा. माताटोली, राजेंद्र वॉर्ड, गोंदिया व सध्या रा. श्रीरामनगर, तुमसर, जिल्हा भंडारा, यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
१५ लाखांचा व्यवहार ठरल्याचा आरोप -
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, सुरेंद्र रिखीलाल टेंभरे (४० वर्ष, रा. नितीननगर, आमगाव), फलेंद्र ताराचंद हुकरे (२४ वर्ष, रा. किकरीपार, आमगाव), देवेंद्र बेनीराम लांजेवार (२६ वर्ष, रा. करंजी, सध्या रा. रिसामा, आमगाव), दिलीप तांबोळी (रा. भोपाळ, मध्य प्रदेश), संजू ऊर्फ विवेकसिंग सिसोदिया (रा. भोपाळ, मध्य प्रदेश) आणि सिंग ऊर्फ अभयराज (रा. हाजीपूर, वैशाली, बिहार; सध्या रा. भोपाळ) यांनी रोहित भिवाडे यांना वनविभागात लिपिकाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे.
नोकरी लावून देण्याच्या नावाखाली १५ लाख रुपयांचा व्यवहार ठरविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर रोहित यांच्याकडून आरोपींनी टप्प्याटप्प्याने एकूण १४ लाख ७० हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे विश्वास संपादन -
रक्कम घेतल्यानंतर रोहित यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी खोट्या ई-मेलच्या माध्यमातून नियुक्तीपत्र, सेवापुस्तक आणि डिमांड ड्राफ्ट दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनावरून आर्थिक व्यवहार झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.या प्रकरणात नोकरीचे आमिष दाखवून मोठी रक्कम घेतल्याचा तसेच बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप असल्याने पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल -
रोहित भिवाडे यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३४१ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चन्नावार करीत आहेत. नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या या प्रकरणात पोलिस तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.




Petrol Price




